नवी दिल्ली : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यातील सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा भागातील कोठी टी पॉईंटजवळ काही पत्रकं टाकली. या पत्रकांमध्ये नक्षलवाद्यांनी सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानविरोधात राळ उठवणं ही सरकारची चूक असल्याचं नक्षलवाद्यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींची विधानं भडकाऊ असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यावरून देशाची दिशाभूल करण्याचा नक्षलवादी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. काश्मिरी जनतेच्या पाठीशी आम्ही आहोत असे सांगून काश्मीर मध्ये आपले पाय पसरण्याचा हा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असल्याचं मत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रबीर कुमार चक्रवर्ती यांनी व्यक्त केले आहे. पुलवाम्यातील हल्ल्यात जवानांच्या मृत्यूला सरकारची धोरणं जबाबदार असल्याची पत्रक नक्षवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा भागात वाटली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावर बोलताना चक्रवर्ती यांनी सांगितलं की सरकार कुठलेही असो नक्षलवादी सरकारच्या प्रत्येक धोरणाविरुद्ध असतात. नक्षलवादी आणि अतिरेकी संघटना यांच्यात यापूर्वीही संबंध असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. श्रीलंकेच्या एलटीटीई या अतिरेकी संघटनेसोबत नक्षलवाद्यांचे संबंध होते आणि एलटीटीई नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करीत होते. तसेच डावी विचारसरणी ही कधीही काश्मीरमध्ये आपले जाळे पसरवू शकली नाही त्यामुळे या माध्यमातून तिथे त्यांचा पाय पसरण्याचा हा प्रयत्न असू शकतो असेही प्रबीर कुमार चक्रवर्ती यांनी सांगितले.


2 नक्षल्यांचा खात्मा  



झारखंडमधील गुमला जिल्ह्यात झालेल्या सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाल यश आले आहे. घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या भागात सर्च ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षलवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना गुमला जिल्ह्यातील कामडारा पोलीस भागात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. या नक्षलवाद्यांकडून मोठा कट रचला गेल्याची माहिती मिळाली होती. नक्षलवादी लपले असलेल्या घटनास्थळी सुरक्षाजवानांकडून घेराव घालण्यात आला होता. नक्षलवाद्यांना शरण येण्यास सांगितले. परंतु, सुरक्षादलाने घातलेल्या घेरावानंतर नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यांना प्रत्युत्तर देत सुरक्षादलाकडूनही गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूने करण्यात आलेल्या या गोळीबारात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात करण्यात आला. सुरक्षादलाकडून परिसरात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.