India Navy New Flag : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते कोचीन शिपयार्ड लिमिटेड इथं भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या विमानवाहू युद्धनौकेचं अनावरण करण्यात आलं. भारतीय नौदलाच्या ताफ्यात पूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत दाखल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाच्या नव्या चिन्हाचंही अनावरण करण्यात आलं. भारतीय नौदलाच्या नव्यानं अनावरण करण्यात आलेल्या ध्वजावर एका बाजूला डाव्या कोपऱ्यात भारताचा राष्ट्रध्वज आहे तर त्याच्या बाजूला भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. नवीन ध्वज समृद्ध भारतीय सागरी वारसाच्या अनुषंगाने असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय. 


पंतप्रधान म्हणाले 'आज 2 सप्टेंबर 2022 या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे एक निशाण, गुलामगिरीचं ओझं उतरवलं आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. शिवरायांच्या राजमुद्रेपासून नौदलाच्या नव्या झेंड्यासाठी प्रेरणा घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आरमार दलाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतीय नौदलाचा ध्वज शिवरायांना समर्पित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं. शिवरायांनी नौदलाचा विकास केला, असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले.


देशाच्या फाळणीनंतर रॉयल इंडियन नेव्ही आणि रॉयल पाकिस्तान नेव्ही अशी विभागणी करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा 'रॉयल' हा शब्द काढून 'इंडियन नेव्ही' ही संज्ञा स्वीकारण्यात आली. 


भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवलं आहे. याचं कारण म्हणजे याआधीच्या भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हा एक पांढरा ध्वज होता, ज्यात आडवे आणि उभे दोन लाल पट्टे होते.  हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. भारतीय नौदलाचे 'सम नो वरुण' हे ब्रीदवाक्य नवीन चिन्हावर कोरलेलं आहे.


नौदलाच्या ध्वजात आजपर्यंत ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता.