नवी दिल्ली: एरवी कायम तोट्यात असणाऱ्या भारतीय रेल्वेला गेल्या काही महिन्यांमध्ये अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या वर्षभरात तिकिट रद्द करण्याच्या शुल्कातून रेल्वेने थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. माहिती अधिकारातंर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वेला या माध्यमातून १५३६.८५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या प्रवाशाने आरक्षित तिकीट रद्द केले तर त्यासाठी रेल्वेकडून विशिष्ट शुल्क आकारले जाते. या माध्यमातून रेल्वेची किती कमाई होते, हे जाणून घेण्यासाठी मध्य प्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. यानंतर ही सर्व माहिती समोर आली. त्यानुसार आरक्षित तिकीटे रद्द करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कामधून रेल्वेला १५१८.६२ कोटी आणि यूटीएसमधून खरेदी केलेली तिकिटे रद्द केल्यामुळे १८.२३ कोटी रुपयांचे उत्त्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वेने दिली. 


याशिवाय, रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात कपात करणार का, असा प्रश्नही चंद्रशेखर गौड यांनी विचारला होता. मात्र, त्यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.