Indian Railway: केंद्र सरकारने रेल्वे प्रकल्पाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन प्रकल्प उभारण्याचा संकल्प रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. याबाबतची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेने चाक कारखाना उभारण्यासाठी निविदा काढली आहे. जिथे दरवर्षी किमान 80,000 चाके तयार केली जातील. तसेच, रेल्वे चाकांचा निर्यातदार होण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, रेल्वेने पहिल्यांदाच खासगी कंपन्यांना रेल्वे व्हील प्लांट उभारण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या 'मेक इन इंडिया' प्लांटमध्ये हायस्पीड ट्रेन आणि पॅसेंजर डब्यांची चाके बनवली जाणार आहेत. दरवर्षी येथे तयार होणाऱ्या 80,000 चाकांसाठी 600 कोटी रुपयांची खात्रीशीर खरेदी केली जाईल.


निविदा जारी


रेल्वेमंत्री म्हणाले की, रेल्वेने चाकांच्या निर्मितीसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित करुन निविदा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय रेल्वेला दरवर्षी दोन लाख चाकांची गरज असते. या योजनेनुसार, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) एक लाख चाकांचे उत्पादन करणार आहे, तर उर्वरित एक लाख चाके या नवीन 'मेक इन इंडिया' प्लांटमध्ये तयार केली जातील.


चाकांची निर्यात


या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांचीही निर्यात केली जाईल आणि ही युरोपीयन बाजारपेठेत निर्यात केली जाईल, या अटीवर ही निविदा देण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. 18 महिन्यांत हा प्रकल्प उभारण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे. सध्या, रेल्वे मुख्यत्वे युक्रेन, जर्मनी आणि झेक प्रजासत्ताक येथून चाके आयात करते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे चाकांची खरेदी रखडली असून रेल्वेला पर्याय शोधणे भाग पडले आहे.


उत्पादन निर्णय


रेल्वेमंत्री म्हणाले, आज ही निविदा काढण्यात आली आहे. आम्ही 1960 पासून युरोपियन देशांमधून चाके आयात करत आहोत. आता आम्ही त्यांची निर्मिती आणि निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल देशात उपलब्ध होण्यासारख्या मुद्यांवर सखोल तांत्रिक विश्लेषण आणि चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की रेल्वे चाकांच्या देशांतर्गत उत्पादनामुळे रेल्वेची मोठी बचत होईल, कारण एका चाकाच्या आयातीवर 70,000 रुपये मोजावे लागतात.


उच्च क्षमतेचे रेल्वे बनवले जातील


वैष्णव म्हणाले की, भारताने मालवाहतुकीसाठी बनवलेल्या कॉरिडॉर आणि बुलेट ट्रेनसाठी उच्च क्षमतेचे रेल (रेल्स) आयात केले होते. परंतु आता ते देशातच बनवण्यासाठी करार केला जाणार आहे. ते म्हणाले, या मेक इन इंडिया करारांतर्गत उच्च क्षमतेच्या रेल्वे देशात बनवल्या जातील. मे महिन्यात रेल्वेने वंदे भारत ट्रेनसाठी 39,000 चाके पुरवण्यासाठी एका चीनी कंपनीला 170 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते.