Railway Rule: आता ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला या गोष्टींचा कधीही त्रास होणार नाही, रेल्वे बोर्डाचा आदेश
रेल्वे बोर्डाने काही नियम बनवले आहे आणि सर्व विभागीय रेल्वेंना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
मुंबई : ट्रेनमधील प्रवास हा सार्वजनिक वाहानातील प्रवास आहे, त्यामुळे सहाजिकच तेथे अनेक लोकांचा वावर असतो. तसे हे देखील लक्षात घ्या व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे ट्रेनमध्ये तुम्हाला वेगवेगळा अनुभव देखील आला असेल. येथे तुमच्या आजूबाजूचे काही सहप्रवासी त्यांच्या मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. तर एखादा प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलत असतात. इतकेच नाही तर काही प्रवासी एकमेकांशी वाद देखील घालत असतात. तर काही प्रवासी रात्री दहा वाजून गेले तरी दिवे लावतात. ज्याचा अनेकांना त्रास होतो. परंतु त्याला सहन करण्याशिवाय दुसरा कोणाताही मार्ग आपल्याकडे नसतो.
परंतु आता तसे होणार नाही. कारण यासंदर्भात रेल्वे बोर्डाने काही नियम बनवले आहे आणि सर्व विभागीय रेल्वेंना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
रेल्वेचा मोठा निर्णय
रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेकडे प्रवाशांच्या अनेक तक्रारी येत होत्या, मात्र आजपर्यंत याबाबत कोणताही नियम बनवलेला नव्हता. आता प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर आता कोणी अशी तक्रार केली असता रेल्वेने अशा लोकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारीही निश्चित केली जाऊ शकते.
अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात सर्व झोनला आदेश जारी केले आहेत. सर्व विभागीय रेल्वेंना या निर्देशाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. या सूचनेची अंमलबजावणी करताना कोणतीही जबरदस्ती करू नये, असेही सांगण्यात आले आहे. या सूचनेचा बहाणा करून प्रवाशांचा छळ होऊ नये असे देखील रेल्वेने आदेश दिले आहेत.
प्रवाशांच्या काय तक्रारी आहेत?
सहप्रवासी फोनवर मोठ्याने बोलतात किंवा गाणी ऐकतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे. रात्रीच्या वेळी डब्यात बसलेली मंडळी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रारी होत्या. रेल्वे एस्कॉर्ट किंवा मेंटेनन्स कर्मचारी मोठ्याने बोलत असल्याच्याही तक्रारी होत्या. त्यामुळे प्रवाशांना झोपेचा त्रास होतो. यासोबतच रात्रीच्या वेळी दिवे लावण्यावरून प्रवाशांमध्ये भांडणे होत आहेत.
रात्री 10 नंतर मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत
- कोणताही प्रवासी फोनवर बोलणार नाही किंवा मोठ्या आवाजात म्युझिक ऐकणार नाही, ज्यामुळे सहप्रवाशाचा त्रास होईल.
- इतर सर्व दिवे रात्री बंद करावे लागतील जेणेकरून सहप्रवाशांना त्याचा त्रास होऊ नये.
- ग्रुपने चालणाऱ्या प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत ट्रेनमध्ये बोलता येणार नाही. सहप्रवाशाच्या तक्रारीवरून कारवाई होऊ शकते.
-टीटीई जसे चेकिंग कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, कॅटरिंग कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी रात्री शांततेने त्यांचे काम करतील जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही.
- यासोबतच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध, अपंग आणि अविवाहित महिलांना रेल्वे कर्मचारी तात्काळ मदत करतील.