ट्रेन प्रवासादरम्यान अचानक मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई मिळते का? रेल्वेचे नियम काय सांगतात वाचा
Indian Railway: भारतीय रेल्वेचे हे नियम तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे.
Indian Railway: भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. कारण ट्रेनमधून प्रवास करणे खूप आरामदायक, सुरक्षित आणि किफायातशीर आहे. लांब पल्ल्याच्या प्रवास करायचा झाल्यास रेल्वे खूप उत्तम पर्याय आहे. ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी काही नियमदेखील लावण्यात आले आहेत. तसंच, ट्रेनमधून प्रवास करताना एखाद्याचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला तर त्या व्यक्तीला किती नुकसानभरपाई दिली जाते, हे जाणून घेऊयात.
अपघात झाल्यावर नुकसानभरपाई
भारतीय रेल्वे विभागानुसार, ट्रेनमध्ये एखाद्या व्यक्तीचा रेल्वेमुळं मृत्यू झाला तर भारतीय रेल्वे त्यांना नुकसानभरपाई देते. मात्र एखाद्या व्यक्तीचा आजारपणामुळं मृत्यू झाला तर रेल्वे कोणतीही नुकसानभरपाई देत नाही.
अनेकदा असं पाहायला मिळतं की रेल्वेत चढताना किंवा उतरताना चेंगराचेंगरी होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. अशावेळी लोकांचा ट्रेन खाली येऊन मृत्यू होण्याची वा गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत जर चुक प्रवाशांची असेल तर कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही. पण जर ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना मृत्यू झाला तर नुकसानभरपाई मिळते.
अनेकदा असं पाहायला मिळतं की एखाद्या व्यक्तीने ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली किंवा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीत रेल्वे कोणतीही मदत करत नाही.
भारतीय रेल्वे एखाद्या व्यक्तीला तेव्हाच नुकसानभरपाई देते जेव्हा चुक रेल्वेची असते. जर रेल्वे अपघात झाला तर त्यातील जखमी व्यक्तींना आणि मयत व्यक्तींना नुकसानभरपाई मिळते.
आयआरसीटीसी रेल्वे प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण प्रदान करते. प्रवाशांसाठी हे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम विमा कव्हर मानले जाते. जर तुम्ही आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटद्वारे ट्रेन तिकीट बुक करत असाल तर पेमेंट प्रक्रियेदरम्यान विम्याचा पर्याय दिला जातो. जर तुम्ही हे निवडले तर तुम्हाला हे विमा कव्हर ३५ पैशांमध्ये मिळेल. विशेष म्हणजे एका पीएनआरमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांसाठी तिकिटे बुक करता येतात आणि हा विमा त्या सर्वांवर लागू आहे.
या विमा संरक्षणाबाबत आयआरसीटीसीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्रवासादरम्यान कोणताही अपघात झाल्यास आणि प्रवाशाला दुखापत झाल्यास, दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षणाची तरतूद आहे. याशिवाय, कायमस्वरूपी, आंशिक अपंगत्वासाठी 7.5 लाख रुपयांचे कव्हर देण्याची तरतूद आहे. दरम्यान, जर एखाद्या प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते आणि कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.