Indian Railway Vista Dome Coaches: प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षांचा सातत्यानं विचार करत त्या दृष्टीकोनातून भारतीय रेल्वेनं अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेल्वेच्या या निर्णयांमध्ये काही वर्षांपूर्वी अशाच एका संकल्पनेनं डोकावलं आणि पाहता पाहता ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली. रेल्वे विभागाला या एका निर्णयातून बराच फायदा झाला आणि प्रवाशांनाही किमान खर्चात प्रवासाचा कमाल आनंद लुटणं सहज शक्य झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे विभागानं घेतलेला हा निर्णय म्हणजे 'व्हिस्टाडोम कोच' (Vistadome Coach). भारतीय रेल्वेच्या वतीनं 2018 मध्ये  (Mumbai - Madgaon) मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदाच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. पुढं त्याला प्रवाशांची इतकी पसंती मिळाली की, 2022 मध्ये तेजस एक्स्प्रेसलाही (Tejas Express) व्हिस्टाडोम कोच जोडत प्रवाशांना अविस्मरणीय प्रवासाची संधीच रेल्वेनं दिली. तिथं (Mumbai pune mumbai) मुंबई- पुणे प्रवासमार्गावरही रेल्वे विभागानं डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडले आणि पाहता पाहता इतरही काही रेल्वेंसाठी या कोचची तरतूद करण्यात आली. 


प्रवाशांनीही रेल्वेच्या वतीनं देण्यात आलेल्या या खास सुविधेचा फायदा घेत प्रवासाचा आनंद द्विगुणित केला. सहसा प्रवास कैक कारणांनी खास ठरतो. पण, या व्हिस्टाडोम कोचनं पावसाळ्यादरम्यान आणि त्यानंतरचे काही दिवस सृष्टीसौंदर्य पाहण्याजोगं असल्यामुळं या काळात कोचला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद असतो. त्याच बळावर 2023-24 मध्ये मध्य रेल्वेच्या तिजोरीत या कोचमुळं 26.50 कोटी रुपयांची भर पडली. यादरम्यान साधारण 1.76 लाख प्रवाशांनी या कोचनं प्रवास केल्याची माहितीसुद्धा मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली. 


अधिकृत माहितीनुसार गाडी क्रमांक 12125/12126 मुंबई- पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेसला सर्वाधित प्रवाशांनी पसंती दिली असून, हा आकडा 99.26 टक्के इतका मोठा आहे. त्यामागोमाग गाडी क्रमांक 11007/11008 मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन एक्स्प्रेसचं नाव येतं. तर, सीएसएमटी- मडगाव ट्रेनच्या व्हिस्टाडोम कोचनं प्रवास करण्यासाठीसुद्धा प्रवाशांनी सातत्यानं पसंती दिल्यानं रेल्वेला या निर्णयाचा फायदा होताना दिसत आहे. 


कमाईच्या बाबतीत गाडी क्रमांक 22119/22120 मुंबई- मडगाव- मुंबई तेजस एक्स्प्रेसनं गेल्या आर्थिक वर्षात 7.68 रुपयांची सर्वाधिक कमाई केली. त्यामागोमाग गाडी क्रमांक 12051/12052 सीएसएमटी- मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसनं 6.16 कोटी रुपयांची भर मध्य रेल्वेच्या तिजोरीत टाकली. 


प्रवाशांना मिळतोय अविस्मरणीय अनुभव 


विमान प्रवास कायमच अनेकांना खुणावत असतो, किंबहुना त्याबद्दल कमालीचं कुतूहल असतं. पण, व्हिस्टाडोम डब्याच्या उपलब्धतेमुळं भारतीय रेल्वेनंही प्रवासाचा वेगळा चेहरा प्रवाशांसमोर आणला. तिथं मुंबई गोवा मार्गावर निसर्गसौंदर्याची मनसोक्त उधळण पाहण्याची संधी या प्रवासात मिळते. तर, इथं मुंबई - पुणे प्रवासादरम्यान पश्चिम घाट प्रवाशांवर भुरळ पाडताना दिसतो. 


हेसुद्धा वाचा : Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न


व्हिस्टाडोम कोचमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा पुरवण्यात येतात. यामध्ये काचेच्या छतासोबत मोठाल्या खिडक्या प्रवासाचं मुख्य आकर्षण. त्याशिवाय फिरत्या- पुशबॅक सीट, एलईडी प्रकाशयोजना, स्वयंचलित कंपार्टमेंट दरवाजे, व्ह्यूइंग गॅलरी यांचा समावेश आहे. 


कोणकोणत्या ट्रेनला आहेत व्हिस्टाडोम कोच? 


  • मुंबई-पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस (2.60 कोटी रुपये) / उत्पन्न रुपयांमध्ये

  • मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (2.35 कोटी रुपये)

  • मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (6.16 कोटी रुपये)

  • डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (2.72 कोटी रुपये)

  • पुणे- सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस (4.98 कोटी रुपये)

  • तेजस एक्स्प्रेस (7.68 कोटी रुपये)