फेब्रुवारीत भारतीय रेल्वेवर येऊ शकतं मोठं संकट! अचानक बंद पडू शकतात ट्रेन्स; कारण...
Indian Railway February 2024: सदर गोष्टीचा फटका हजारो ट्रेन्सला बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
Indian Railway February 2024: फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीमध्ये भटंकतीला जाण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. ही बातमी रेल्वेसंदर्भातील आहे. उत्तर पश्चिम रेल्वे एम्पलॉइज यूनियन म्हणजेच NWREU फेब्रुवारी महिन्यात ट्रेन बंद पाडण्याच्या तयारीत आहे. देशभरामध्ये मागील बऱ्याच काळापासून ओपीएस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम अर्थात जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. आता या ओल्ड पेन्शन स्कीमसाठी रेल्वेचे कर्मचारीही आर या पारची लढाई लढण्याच्या तयाकरीत आहेत. NWREU ने फेब्रुवारी महिन्यामध्ये रेल्वे रोको आंदोलन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे NWREU च्या या आंदोलनामध्ये NWREU बरोबर देशभरातील इतर रेल्वे कर्मचारी संघटनाही सहभागी होणार असल्याचा युनियनचा दावा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीच...
भारतामध्ये पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या आतमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या अगदी तोंडाशी ओपीएसच्या मागणीसाठी NWREU च्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हे आंदोलन फेब्रुवारी महिन्यात केलं जाणार आहे. मात्र त्यासंदर्भातील तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. सध्या तरी या प्रस्तावित रेल रोको आंदोलनासंदर्भात कर्मचारी महासंघाचं रेल्वेचे अधिकारी आणि केंद्र सरकारशी कोणतंही बोलणं झालेलं नाही.
आंदोलन कसं असणार?
NWREU चे महासचिव मुकेश माथुर यांनी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन कसं असेल याची माहिती दिली. 8 ते 11 जानेवारीदरम्यान NWREU चे कर्मचारी लाक्षणिक उपोषण करतील. याचा कालावधीमध्ये फेब्रुवारीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल नियोजन आणि रणनिती तयार केली जाईल, असं माथुर म्हणाले. ओपीएससाठी सरकारकडे सर्व प्रकारच्या मागण्या करुन आम्ही थकलो आहोत, असं कर्मचारी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आंदोलनाशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
कोट्यवधी लोकांना बसणार फटका
या क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, हे आंदोलन प्रत्यक्षात होण्याआधी सरकार यावर काही ना काही मार्ग नक्की काढेल. मात्र आंदोलन झाल्यास हजारो ट्रेन्सच्या वाहतुकीला फटका बसेल. उत्तर पश्चिम रेल्वेच्या मार्गावर विकास कामांसाठी आधीच ट्रेन अनेकदा रद्द केल्या जातात. अशात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं तर कोट्यवधी लोकांना याचा फटका बसेल. आता सध्या तरी 8 ते 11 जानेवारीदरम्यान होणाऱ्या लाक्षणिक उपोषणावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये काय होतं यावरच पुढील आंदोलन अवलंबून असणार आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोणाऱ्या रेल्वेच्या जाळ्यामध्ये NWR मार्गाला फार महत्त्व आहे.