भंगार विकून भारतीय रेल्वेने कमवले कोट्यवधी रुपये
आकड़ा पाहून थक्कच व्हाल....
मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त मानल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वे मंत्रालयाविषयीची आणखी एक माहिती समोर येत आहे. एक मोठी धनराशी रेल्वे मंत्रालयाच्या खात्यात जोडली गेली आहे. ज्याचा स्त्रोत सर्वांनाच थक्क करुन जात आहे. आरटीआय अहवालाला उत्तर देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीतून रेल्वे मंत्रालयाच्या खात्यात जोडल्या गेलेल्या कोट्यवधी रुपयांचा आकडा समोर आला आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या या माहितीनुसार गेल्या १० वर्षांमध्ये विकण्यात आलेल्या भंगार विक्रीविषयी करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार २००९- १० आणि २०१८- १९ या कालावधीत विविध प्रकारच्या भंगारची विक्री करुन या विभागाने तब्बल ३५ हजार ०७३ कोटी रुपये कमवले आहेत. या भंगारमध्ये कोच, वॅगन्स आणि रुळांचा समावेश आहे.
रेल्वे रुळांपासूनच्या भंगारची विक्री पाहता एक गोष्ट स्पष्ट होत आहे की २००९- १० पासून २०१३- १४ या पाच वर्षांच्या तुलनेत २०१४- १५ ते २०१८- १९ या वर्षांमध्ये रेल्वे रुळांपासूनच्या टाकाऊ वस्तूंचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये रेल्वे रुळांमध्ये झालेल्या बदलांचं प्रमाण कमी होतं, ही बाबही समोर आली आहे. सध्याच्या घडीला भंगारच्या विक्रीतून झालेल्या कमाईचे हे आकडे सर्वांना थक्क करत आहेत. ज्यामुळे भारतीय रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.