Express Train Manually Moved Away by Soldiers: तुम्ही आतापर्यंत बसला धक्का देताना, कारला धक्का देताना, रिक्षाला धक्का देताना पाहिलं असेल पण कधी ट्रेनला धक्का देऊन सुरु करण्यात आल्याचं पाहिलं आहे का? मुळात हा प्रश्न वाचूनच तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखा प्रश्न आहे. एखादी ट्रेन धक्का देऊन कशी सुरु केली जाऊ शकते. हे शक्य तरी आहे का असं बरंच काय काय मनात येईल. मात्र खरोखरच धक्का देऊन ट्रेन सुरु करण्याची घटना घडली आहे आणि ती सुद्धा भारतात. ही घटना 2 दिवसांपूर्वीची आहे. मात्र संपूर्ण ट्रेन नाही तर रुळावरील 3 डब्ब्यांना धक्का देऊन ते पुढे सरकवण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मात्र यामागील सत्य ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि या धक्का देणाऱ्या जवानांचं कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.


रेल्वेसंदर्भात शंका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही रेल्वे कर्मचारी आणि पोलीस ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत. या लोकांनी एकत्र जोर लावून ट्रेनला धक्का दिल्यानंतर ट्रेनचे डबे पुढे चालू लागतात. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या शक्यता व्यक्त करत आहेत. काहीजणांनी यावरुन सरकारवर निशाणा साधलाय तर काहींनी भारतीय रेल्वेवर अशी वेळ का आलीय असा सवाल विचारला आहे. अनेकांनी रेल्वेच्या कारभारावर शंका उपस्थित केली आहे. मात्र या संपूर्ण घटनाक्रमामागील सत्य समोर आलं आहे. हे वाचून तुम्हीही या जवानांना नक्कीच सलाम कराला.


...म्हणून ढकलले डबे


झालं असं की, 3 दिवसांपूर्वी हैदराबादला जाणाऱ्या हावडा - सिंकदराबाददरम्यान धावणाऱ्या फुलकनुमा एक्सप्रेसच्या 5 डब्ब्यांना बोम्माईपल्लीजवळ आग लागली. दक्षिण मध्य रेल्वेच्या सीपीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत एस 2 ते एस 6 डबे जळून खाक झाले. ही आग वाढत चालली होती. आगीच्या ज्वालांमध्ये इतरही डबे भस्म होणार होते. मात्र आग अधिक पसरु नये म्हणून प्रसंगावधान दाखवत 3 डबे या मूळ गाडीपासून वेगळे करण्यात आले. यामध्ये एस 1 आणि 2 जनरल डब्यांचा समावेश होता. हे डबे आग लागलेल्या ट्रेनच्या मागील बाजूपासून वेगळे करण्यात आले.



डबे दूर नेले


त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे डब्ब विरुद्ध बाजूला ढकलण्यास सुरुवात केली. आग लागलेल्या ट्रेनपासून हे तिन्ही डबे हे जवान दूर घेऊन गेले. गाडीचं अधिक नुकसान होऊ नये आणि या डब्यांमध्ये असलेलं प्रवाशांचं सामना जळून खाक होऊ नये म्हणून डबे दूर करण्यात आले. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांनुसार संपूर्ण ट्रेन नाही तर केवळ 3 डबे या जवानांनी ढकलले. रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे डबे जळत्या ट्रेनपासून दूर करण्यासाठी इंजिन रवाना करण्यात आलेलं. मात्र इंजिन पोहचेपर्यंत उशीर झाला असता. म्हणूनच जवानांनी पुढाकार घेत स्वत: हे डबे जळत्या ट्रेनपासून दूर केले.



लाखो रुपये वाचले


या जवानांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि एकजुटीने केलेल्या या कामाचं सध्या सोशल मीडियावरुन कौतुक होताना दिसत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे रेल्वेचं लाखो रुपयांचं नुकसान होण्यापासून वाचलं.