Indian Railway: भारतीय रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात विस्तारलेले आहे. देशात दररोज लाखो-करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय, मजदूर यांचा मोठा समावेश असतो. यातील बहुतांश पोटा पाण्यासाठी दूरच्या शहराचा प्रवास करतात. भारतीय रेल्वेमुळे त्यांना कमी किंमतीत लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. दरम्यान भारतीय रेल्वेकडून देशातील गरीब आणि सामान्य जनतेला एक गिफ्ट मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच लांब मार्गांवर नियमित नॉन-एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या मार्गांवर या रेल्वे सेवा सुरू होतील, असे सांगितले जात आहे. करोडो कामगार कामाच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये प्रवास करतात. त्यामुळे गरीब आणि कामगार वर्गातील लोकांसाठी ही एक मोठी पर्वणी मानली जात आहे.


पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, बंगाल आणि झारखंड यांसारख्या भागातील प्रवाशी मोठ्या प्रमाणात इतर शहरांमध्ये नोकरी धंद्यासाठी विस्थापीत झालेले असतात. विशेषत: स्थलांतरित कामगार, दिल्ली, मुंबई, सुरत, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि काही भागांमध्ये उपजीविकेच्या संधींच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये प्रवास करतात. वेटिंग लिस्ट तिकिटांच्या पॅटर्नचा अभ्यास करून आणि अनेक स्थानकांवर जास्त गर्दीचे मूल्यांकन केल्यानंतर रेल्वेने हे मार्ग ओळखले आहेत. 


प्रमुख रेल्वे मार्गांवर कायमस्वरूपी गाड्या धावणार 


या रेल्वे सेवा कायमस्वरूपी केल्या जाणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या इतर गाड्यांवरील प्रवाशांचा दबाव कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे दरवर्षी सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी ठराविक मार्गांवर विशेष गाड्या चालवते, मात्र आता  या बिगर एसी गाड्या कायमस्वरूपी धावणार आहेत. गेल्या 9 वर्षांत, रेल्वेने सुमारे 20 हजार किमी मार्गाचे नवीन ट्रॅक टाकले आहेत, त्यामुळे आता अधिक गाड्या चालवण्याची अतिरिक्त क्षमता निर्माण झाली आहे.


ज्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार मोठ्या शहरांमध्ये जातात त्या भागातून कमी भाड्याच्या नॉन-एसी गाड्या धावतील. हा मार्ग ठरविण्यासाठी रेल्वेने ऐतिहासिक डेटा आणि मूळ-गंतव्य पॅटर्नचा विचार केला आहे.


करोना महामारीत मोठ्या शहरांमधून स्थलांतरित कामगारांना घरी परत आणण्यासाठी रेल्वेने या मार्गांवर शेकडो विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्या चालवल्या होत्या. भारतीय रेल्वे पुढील 3 वर्षांत उर्वरित 20 हजार जुन्या पारंपारिक डब्यांचे रूपांतर अधिक सुरक्षित LHB डब्यांमध्ये करणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.