नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेच्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ केली आहे. रेल्वेने एक्स्प्रेसच्या तिकीट दरात १ जानेवारीपासून वाढ केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका किलोमीटरसाठी १ पैसा अशी ही दरवाढ आहे.  नॉन एसी / बिना वातानुकूलित डब्याच्या तिकीट दरात एका किलोमीटरसाठी २ पैसे, तसंच एसी डब्याच्या/ वातानुकूलित डब्याच्या तिकीट दरात एका किलोमीटरसाठी ४ पैसे अशी ही दरवाढ असणार आहे. शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेस गाड्यांसाठी सुद्धा ही दरवाढ लागू असणार आहे. मात्र रिझर्वेशन चार्ज आणि सुपरफास्ट चार्जमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. सोबतच लोकल आणि उपनगरीय रेल्वेच्या भाड्यामध्ये मात्र कोणतीही वाढ होणार नसल्याचं कळत आहे. 


दरवाढीचे हे आकडे पाहिले तर, लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. सोप्या भाषेत म्हणावं तर, दिल्लीपासून भोपाळपर्यंतचा प्रवास करायचा असल्यास, साधारणपणे हे अंतर ७०० किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे या प्रवासासाठी तुम्हाला स्लीपर कोचसाठी १४ रुपये आणि वातानुकूलित डब्यासाठी २८ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. 


नववर्षाच्या पहिल्या दिवशी पाहा गंगा आरतीची सुरेख दृश्य


रेल्वेमध्ये सध्या जवळपास १३ लाख कर्मचारी सेवेत रुजू आहेत. त्यांच्यासाठी सातव्या वेतन आयोगाची शिफारस मंजूर केल्यानंतर रेल्वे मंत्रालयावर आर्थिक बोजा वाढला. परिणामी ही भाडेवाढ करण्यात आल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आली. त्याशिवाय आणखी एक कारणही पुढे करण्यात आलं आहे. रेल्वेच्या देखभालीचा खर्च आणि सातत्याने होणारा तोटा हीसुद्धा या भाडेवाढीची दुसरी कारणं. 



रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याकडेही यापुढे  रेल्वे मंत्रालयाचा भर असेल असं सांगण्यात आलं आहे. नव्या वर्षापासून ही नवी भाडेवाढ आणि तिकीटदर लागू करण्यात येणार आहेत. तेव्हा आता या भाडेवाढीनंतर कोणत्या सुविधा रेल्वेकडून पुरवण्यात येणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.