नवी दिल्ली - विमानप्रवासासाठी ज्या प्रमाणे विमानतळावर किमान तासभर आधी पोहोचावे लागते. त्याचप्रमाणे आता कोणतीही रेल्वे पकडण्यासाठीही ऐनवेळी रेल्वे स्टेशनवर जाऊन उपयोग नाही. रेल्वे सुटण्याच्या किमान १५ ते २० मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचणे बंधनकारक करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनवर पोहोचून प्रवाशांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सोपस्कार पूर्ण करून मगच रेल्वेच्या डब्यात बसण्यासाठी स्टेशनवर गेले पाहिजे, असा नियम लवकरच देशातील सर्व रेल्वे स्टेशनवर अमलात येणार आहेत. त्यामुळे अगदी ऐनवेळी कोणताही प्रवासी स्टेशनवर पोहोचला तर भविष्यात कदाचित त्याला रेल्वेत प्रवास नाकारलाही जाऊ शकतो. या महिन्यात होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या सुरक्षानियमांची अंमलबजावणी सध्या अलाहाबाद स्टेशनवर सुरू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. त्यापैकी बहुतेक जण अगदी ऐनवेळी स्टेशनवर पोहोचतात. काहीजण तर रेल्वे सुरू झाल्यानंतर धावत धावत जाऊन गाडी पकडतात. अशी दृश्ये देशातील कोणत्याही स्टेशनवर अगदी सामान्यपणे दिसतात. पण सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक नियम अमलात आणले जाण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठीच आता रेल्वे स्टेशनवर गाडी सुटण्याच्या किमान १५ ते २० मिनिटे अगोदर पोहोचणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सध्या अलाहाबाद आणि पश्चिम बंगालमधील हुगळी स्टेशनवर या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच या स्टेशनवरून सुटणाऱ्या गाडीमध्ये अगदी ऐनवेळी प्रवाशांना प्रवेश दिला जात नाही. रेल्वेगाडी पकडण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे अगोदर स्टेशनवर पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पुढील काही दिवसांत देशातील २०२ स्टेशन्सवरही या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरूण कुमार यांनी ही माहिती वृत्तसंस्थेला दिली.


रेल्वे स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत. त्या सर्व ठिकाणांची पाहणी केली जाईल. त्यानंतर स्टेशनच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक मार्गावर सुरक्षारक्षक तैनात केले जातील. या सुरक्षारक्षकांकडून प्रत्येक प्रवाशाची तपासणी, त्याच्याकडील सामानाची तपासणी केली जाईल आणि मगच त्याला स्टेशनमध्ये सोडण्यात येईल. रेल्वे सुटण्याच्या १५ ते २० मिनिटे आधी संबंधित प्लॅटफॉर्मवर बाहेरून कोणालाच आत सोडण्यात येणार नाही. अर्थात विमानतळासारखे यासाठी रेल्वे सुटण्याच्या खूप आधी स्टेशनवर येण्याची गरज नाही. प्रवाशांनी किमान १५ ते २० मिनिटे आधी आले तरी चालेल, असेही अरूण कुमार यांनी स्पष्ट केले आहे.