Indian Railways : लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वेने 14 फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये (IRCTC) प्रवाशांना शिजवलेलं अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 रोजी रेल्वेने केटरिंग सेवा बंद केल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय
देशात कोविडच्या प्रकरणांमध्ये घट होत असल्याने, कोविड निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील ही सेवा  पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेनमध्ये पुन्हा शिजवलेले अन्न देण्यासाठी IRCTC कडून सर्व तयारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 टक्के ट्रेनमध्ये शिजवलेल्या अन्नाची (Cooked Food) सुविधा दिली जात होती.


प्रीमियम ट्रेनमध्ये सुरु आहे सेवा
कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर 22 जानेवारीपर्यंत 80% ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न सेवा सुरू करण्यात आली होती. आता ही सुविधा उर्वरित गाड्यांमध्ये १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये शिजवलेल्या अन्नाची सुविधा 21 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


स्वच्छतेसाठी हे उचललं पाऊल 
स्थानकांच्या स्वच्छतेबाबतही रेल्वे प्रशासनाकडून पाऊल उचलण्यात आलं आहे. नव्या नियमानुसार रेल्वेच्या आवारात कोणीही अस्वच्छता करताना दिसल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (National Green Tribunal) ने अस्वच्छता करणाऱ्या लोकांसाठी कडक पावलं उचलली असून, त्याअंतर्गत आता कचरा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.