Indian Wrestler Protest : भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दोन एफआयआर (FIR) आणि पोस्कोअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदावरुन हटवून तुरुंगात टाकत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका भारतीय कुस्तीपटूंनी (Indian Wrestler) घेतली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधींनी घेतली भेट
दरम्यान, भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणात पंतप्रधानांकडून (PM Narendra Modi) कोणतीही अपेक्षा नाही, आपल्या कुस्तीपटूंबद्दल काळजी वाटत असती तर पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा केली असती. सरकार ब्रिजभूषण सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे, असा आरोप प्रियंका यांनी यावेळी केला. 


भारतीय क्रिकेटपटूंना सवाल
कुस्तीपटूंच्या आंदोलनावर एकाही भारतीय क्रिकेटर्सने (Indian Cricketers) प्रतिक्रिया किंवा पाठिंबा दिलेला नाही. इतर खेळातील खेळाडूही अद्याप गप्प आहेत. यावर कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) प्रश्न उपस्थित केला आहे. विनेश फोगाट साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांच्यासहित इतर कुस्तीपटूंबरोबर आंदोलनात सहभागी झाली आहे. 


आमची इतकी ही लायकी नाही का?
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत विनेश फोगाने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. संपूर्ण देशात क्रिकेटची पूजा केली जाते. पण एकाही क्रिकेटर्सने आंदोलनाला पाठिंबा सोडा साधी प्रतिक्रियाही दिलेली नाही. क्रिकेटर्सने आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आम्हाला म्हणायचं नाही पण निदान त्यांनी एक तटस्थ संदेश तरी देणं अपेक्षित होतं, आमची इतकीही लायकी नाही का? असा प्रश्न विनेश फोगाटने विचारला आहे. क्रिकेटर्सबरोबरच बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, बॉक्सिंगमधल्याही खेळाडूंनी या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.


अमेरिकेलत्या ब्लॅक लाइव्स प्रकरणात सर्व खेळाडूंनी आंदोलकना आपलं समर्थन दिलं होतं. आम्ही जेव्हा एखाद्या स्पर्धेत मेडल जिंकतो तेव्हा सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जातात, क्रिकेटर्सही आमच्या अभिनंदनाचं ट्विट करतात. पण आता काय झालं? तुम्ही या यंत्रणेला घाबरता का? असा सवालही विनेश फोगाटने उपस्थित केला आहे. 


पीटी उषा यांच्याबद्दल नाराजी
भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी केलेल्या वक्तव्यावरही विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय कुस्तीपटूंचं आंदोलन अनुशासनहीनता असल्याचं पीटी उषा यांनी म्हटलं होतं. पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील असल्याचं भारतीय कुस्तीपटूंनी म्हटलंय. आम्ही रस्त्यावर बसलोय यामागे काहीतरी गंभीर कारण असेल, पण आमचं कोणी ऐकायलाच तयार नाही, अशी खंतही कुस्तीपटूंनी व्यक्त केली आहे.