जाडजूड पगार की सुरक्षित नोकरी? भारतीयांसाठी काय महत्त्वाचं...
`ऑलिव्हबोर्ड` नावाच्या संस्थेकडून हा सर्व्हे करण्यात आला
बंगळुरू : भारतातील नोकरदार वर्गाचा नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये भारतीय तरुण गलेलठ्ठ-जाडजूड असा पगार की सुरक्षित नोकरी? यामध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देतात, यावर अभ्यास करण्यात आला. या सर्व्हेच्या अहवालानंतर काही गोष्टी ठळ्ळकपणे समोर आल्यात. या सर्व्हेच्या अहवालानुसार, भारतीय तरुण सर्वात जास्त महत्त्व सुरक्षित नोकरीला देतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ते खासगी आयुष्य आणि कार्यालयीन काम यांचं संतुलन टिकवून ठेवण्याला महत्त्व देतात. यासाठीच भारतीय तरुणांचा बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकऱ्यांकडे जास्तीत जास्त कल असल्याचं दिसून येतं. या सर्व्हेमध्ये देशभरातील बँकिंग आणि सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या पाच हजार तरुणांची मतं समाविष्ट करण्यात आली.
'ऑलिव्हबोर्ड' नावाच्या संस्थेकडून हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये जवळपास ४४.३ टक्के तरुणांनी सुरक्षित नोकरीसाठी आपलं मत नोंदवलं. तर ३६.७ टक्के युवकांनी काम आणि खासगी आयुष्यातील संतुलन कायम ठेवण्याला मत दिलं. गलेलठ्ठ पगाराला केवळ ११.१ टक्के तरुणांनी महत्त्व दिलं. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या या तरुणांपैंकी ७९ टक्के तरुण टियर-२ आणि टियर-३ शहरांमधून होते.
'ऑलिव्हबोर्ड'चे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाधिक लोकसंख्या छोट्या शहरांत आणि गावात राहते. इथं सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी सर्वात जास्त असते. हा सर्व्हे समाजातील उपेक्षित वर्गाच्या स्वप्नांवर आणि प्रेरणांवर प्रकाशझोत टाकतो.
सर्व्हेनुसार, २३ टक्के तरुणांना इंग्रजी ऐवजी हिंदीमध्ये उत्तर देण्याचा पर्याय निवडला.