मुंबई : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाला भारतीयांकडून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून होतं, २२ जुलै हा दिवस भारतीयासाठी फार महत्वाचा होता. प्रत्येक भारतीयाच्या नजरा या मोहिमेकडे खिळल्या होत्या. कारण याचं दिवशी ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपन यशस्वीरित्या पार पडणार होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीहरीकोटा येथील तळावरुन सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. जीएसएलव्हीएमके३-एम१ प्रक्षेपकाने चांद्रयान-२ ला पृथ्वीच्या कक्षेतून सोडले. त्यानंतर जगातून इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. 


चांद्रयान २ मोहिमेबद्दल अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासानेही इस्रोचे अभिनंदन केले होते. मात्र नासाने ट्विटर इस्रोचं अभिनंदन ट्वीट केलं आणि ते अनेक भारतीयांना खटकले. भारतीयांनी नासाच्या या ट्विटला चांगलंच ट्रोल केलं. 


जगाच्या प्रत्येक स्तरातून इस्रोची प्रशंसा केली जात होती. या कामगिरीबद्दल इस्रो या संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. नासा या संस्थेने इस्रोसाठी एक ट्विट केलं आहे. ज्यात 'नासा'ने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या 'चांद्रयान २' च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोचे अभिनंदन केले. 


'तुमच्या या मोहिमेमध्ये आमच्या डीप स्पेस नेटवर्क तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संवाद प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे.' तसेच 'चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आम्ही पुढील काही वर्षात आर्टिमीस मोहिमेअंतर्गत अंतराळवीर पाठवणार असल्याने, तेथील गोष्टी चांद्रयानाच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत,’ असे ट्विट नासा या संस्थेने केले आहे.


अनेक भारतीयाना हे ट्विट खटकलं आणि नासा या संस्थेला भारतीयांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे. नासाच्या या ट्विटमध्ये इस्रोचं कौतुक करण्याऐवजी, नासा ही संस्था किती जास्त श्रेष्ठ आहे, असा दाखवण्याचा प्रयत्न केला. 


अनेक भारतीयांना याचा राग आला आणि या ट्विटला अनेक भारतीयांनी प्रतिउत्तर दिले आहे. अनेक भारतीय नेटकऱ्यांनी, नासाला चांगलेच सुनावलं आहे. काही नेटकरीच्या कमेंटमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, नासा त्यांच्या भविष्यातील मोहिमेचीच जाहिरात करत आहे, अशी टीका नेटकरी करत आहेत.


काही भारतीय नेटकऱ्यांनी नासाला प्रतिक्रिया देतांना असे म्हटले आहे की, आम्हाला खात्री आहे, तुम्ही आर्टीमीससाठी आमची मदत घ्याल. भारतीय चांद्रयान ४८ दिवसांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राचा अभ्यास करायला सुरूवात करणार आहे. 


चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन या देशानेच हा विक्रम केला होता.