Covid Vaccine : भारतीयांना 750 रूपयांत मिळणार सिंगल डोस कोरोना लस
कोरोनाच्या व्हायरसला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली.
मुंबई : देशावरून कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. कोरोनाच्या व्हायरसला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली. तर आता या मोहीमेला पुढच्या महिन्यात वेग मिळणार असल्याची शक्यता आहे. देशात मॅनुफॅक्चर होणारी सिंगल डोज असणारी 'स्पूतनिक लाइट' येत्या सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे.
पॅनेसिया बायोटेकने अलीकडेच भारताच्या ड्रग्ज रेग्युलेटरसमोर अर्ज सादर केला आहे. यामध्ये आपात्कालीन वापराची परवानगी मागितली होती. पॅनेशिया आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्यात आधीच भागीदारी झाली होती. 'स्पुतनिक लाइट' सुरुवातीला मर्यादित प्रमाणात उपलब्ध असणार आहे. ज्याची किंमत 750 रुपये असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
स्पुतनिक लाइट ही लस गामलेया इंस्टिट्यूटने विकसीत केली आहे. तर चाचणीमध्ये ही लस 80 टक्के यशस्वी ठरली आहे. मे महिन्यात ही लस रशियामध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली होती. तज्ज्ञांनी ही लस अधिक 'अनुकूल' मानली. तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या दरम्यान, एकाच डोसची लस लवकरात लवकर खूप उपयोगी पडू शकते.
सध्या, दोन-डोस असलेसी स्पुतनिक व्ही लस वापरली जात आहे. हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजवर ही लस भारतात देण्याची जबाबदारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पुतनिक व्हीची कमतरता या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येऊ शकते. 'स्पुतनिक व्ही'चे पूर्ण रोलआउट थांबवण्यात आले होते, त्यामुळेच त्याला विलंब होत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत तज्ज्ञ समितीने डॉ.रेड्डींना रशियन डेटा भारतात मंजुरीसाठी सादर करण्याची परवानगी दिली होती. स्पुतनिक लाइट हा प्रत्यक्षात स्पुटनिक व्ही चा पहिला डोस असल्याने ही परवानगी देण्यात आली होती.