मुंबई : अलिकडच्या काळात ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यावर सर्वांचाच भर दिसतोय. आता भारतात लवकरच एक असं ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च होणारंय जे अलिबाबालाही मागे टाकेल. हे पोर्टल चीनलाही मोठा दणका देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 लाख कंपन्या एकाच पोर्टलवर 


सध्या ऑनलाईन खरेदीचा बोलबाला आहे. भारतात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ऑनलाईन साईट्सवरून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी होते. जगात सर्वाधिक चलती अलिबाबाची आहे. पण जरा थांबा कारण अलिबाबालाही मागे टाकेल असं आपलं देशी पोर्टल लॉन्च होणारंय. भारत-ई-कॉमर्स असं या पोर्टलचं नाव असून 11 मार्चला ते लॉन्च होईल. 8 कोटी व्यापाऱ्यांचा सहभाग असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटमार्फत हे पोर्टल तयार करण्यात आलंय.


सध्याच्या घडीला सात लाख विक्रेते भारत-ई-कॉमर्सवर असतील. याचाच अर्थ तुमच्या सगळ्या गरजा भागवणा-या वस्तू एका क्लिकवर तुम्हाला मिळू शकतील. 2023 पर्यंत जवळपास 1 कोटी विक्रेत्यांना पोर्टलसोबत जोडण्य़ात येईल. सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठी ई-पोर्टल कंपनी असलेल्या अलिबाबासोबत 80 लाख विक्रेते जोडले गेले आहेत. ऍमेझॉनसोबत 5 लाख तर फ्लिपकार्टसोबत 1.5 लाख व्यापारी जोडलेले आहेत. 


सध्याच्या घडीला भारत ई कॉमर्स पोर्टल तयार करणाऱ्या कॅटसोबत 8 कोटी व्यापारी जोडले गेले आहेत. इथल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये जवळपास 40 ते 45 कोटी लोकं काम करतात. भारत-ई-कॉमर्स ही भारतीयांसाठी हक्काची बाजारपेठ असेल. जिथं ग्राहक म्हणून तुम्हालाही तुमच्या बजेटनुसार हवी ती वस्तू खरेदी करता येईल. 


भारत-ई-कॉमर्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं चिनी वस्तूंना अजिबात थारा नसेल. या पोर्टलमध्ये कोणतीही परदेशी गुंतवणूक नसल्यानं देशी वस्तूंना प्राधान्य असेल. शिवाय हे पोर्टल अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बनवण्यात आलंय. यात वस्तूंची गुणवत्ता, सोप्या पद्धतीनं खरेदी प्रक्रिया आणि लवकरात लवकर वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्यात आलाय. त्यामुळे हे संपूर्ण स्वदेशी पोर्टल अलिबाबालाही मात देईल यात शंका नाही.