कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात ५५ हजार रुग्ण वाढले
शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ५५०७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील १६,३८,८७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५,४५,३१८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १०,५७,८०६ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. गुरुवारी देशभरात एकूण ६,४२,५८८ कोरोना चाचण्या झाल्या. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये घाबरून जाऊ नका, असे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचा हा वेग नागरिकांना नक्कीच चिंतेत टाकत आहे.
महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ११,१४७ रुग्ण आढळले. तर २६६ जणांचा मृत्यू झाला. परंतु, काल राज्यात कोरोनावर मात केलेल्या ८८६० रुग्णांना घरीही सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६०.३७ % एवढे झाले आहे. ही महाराष्ट्राच्यादृष्टीने समाधानाची बाब मानली जात आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थितीत आता बऱ्याच अंशी नियंत्रणात आली आहे. मात्र, सध्या पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. गुरुवारी पुण्यात कोरोनाचे १,६९९ नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५३,४३७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौराही केला होता.