नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना व्हायरसच्या ८३,८०९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या १०५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४९,३०,२३७ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ९,९०,०६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३८,५९, ४०० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ८०,७७६ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा



 दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी संसदेत देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी असल्याचा दावा केला होता. तसेच कोरोनाचे बहुतांश रुग्ण हे महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. जगातील इतर देशांची तुलना करता भारताने कोरोनाच्या संसर्गाला आणि मृत्युदराला बऱ्याच अंशी आळा घातल्याचेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले होते. 

दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे राज्य आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या १७,०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर २५७ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० जण करोनामुक्त झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के आहे.