नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९६,४२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११७४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२,१४,६७८ इतकी झाली आहे. यापैकी १०,१७,७५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४१,१२,५५२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, आतापर्यंत देशातील ८४,३७२ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. 
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी राज्यात २४,६१९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११,४५,८४० इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जमावबंदीच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात


 



तर कोरोनावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवलेल्या मुंबईतही आता पुन्हा एकदा रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८० दिवसांपर्यंत वाढला होता. मात्र, गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. 

गेल्या काही दिवसांत मुंबईत दररोज २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत मुंबईतील ८,३२३ लोकांनी प्राण गमावले आहेत. सध्या ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा डबलिंग रेट ५० दिवसांपेक्षाही कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.