मुंबईत जमावबंदीच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांच्या वर पोहोचली आहे. 

Updated: Sep 18, 2020, 09:14 AM IST
मुंबईत जमावबंदीच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यानंतर आता पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून संबंधित प्रवाशांना जमावबंदीच्या आदेशाबद्दल सांगितले जात आहे. तसेच मास्क परिधान करणे व इतर नियमांचे पालन करण्याबाबतही पोलीस प्रवाशांना बजावत आहेत.

रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या आक्रमक उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आला होता. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८० दिवसांपर्यंत वाढला होता. मात्र, गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबईत दररोज २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत मुंबईतील ८,३२३ लोकांनी प्राण गमावले आहेत. सध्या ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा डबलिंग रेट ५० दिवसांपेक्षाही कमी झाला आहे. त्यामुळे आता मुंबईत पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ तरी... आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती

या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी असेल. या काळात लोक कारणाशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.