कोविड-१९ : आरोग्य मंत्रालयाकडून खूशखबर, १५ लाख रुग्णांची कोरोनावर मात
देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : देशभरात सक्त नियम लागू असताना देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असताना आरोग्य मंत्रालाकडून एक दिलासा देणारी बाब समोर येत आहे. भारतात आतापर्यंत १५ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही महामारी लवकरच नियंत्रणात येईल असं ट्विट आरोग्य मंत्रालयाने केलं.
त्याचप्रमाणे आज देखील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात १० राज्य अशी आहेत ज्याठिकाणी कोरोना संसर्गाचं प्रमाण ८० टक्के अधिक आहे. पण ही संख्या देखील लवकरच नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
दरम्यान, देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११ वर पोहोचली आहे. त्यापैकी ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १४ लाख ४० हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४३ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १५ हजार ३३२ इतकी झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ५५८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.