ट्रेन-१८ आता वंदे भारत एक्स्प्रेस नावानं धावणार
ट्रेन-१८ या लांब पल्ल्याच्या गाडीचं नामकरण करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : ट्रेन-१८ या लांब पल्ल्याच्या गाडीचं नाव आता वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण ट्रेनची बांधणी भारतातच करण्यात आली आहे. दिल्ली आणि वाराणसी या मार्गावर ही एक्स्प्रेस धावते. इंजिन नसलेल्या या ट्रेनला चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये बनवण्यात आलं आहे.
बुलेट ट्रेनच्या मॉडलवर ट्रेन तयार
आधुनिक सुविधा असलेल्या या ट्रेनला बुलेट ट्रेनच्या मॉडलवर तयार करण्यात आलंय. संपूर्णपणे कॉम्प्युटरकृत असणाऱ्या या ट्रेनला शताब्दीच्या मार्गांवर चालवण्यात येणार आहे. या ट्रेनचा वेग १६० किमी प्रती तास आहे. तर शताब्दीचा वेग १३० किमी प्रती तास आहे. या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल.
एक्झ्युकिटिव्ह कोचमध्ये ५२ सीट
ट्रेनच्या दोन एक्झ्युकिटिव्ह कोचमध्ये ५२ जागा असतील. तर उरलेल्या कोचमध्ये ७८ प्रवाशांची बसण्याची सोय करण्यात आली आहे.
ट्रेन बनवण्यासाठी १०० कोटींचा खर्च
ही ट्रेन तयार करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या ट्रेनला रेकॉर्ड १८ महिन्यांमध्ये बनवण्यात आलंय. जर परदेशातून ही ट्रेन मागवण्यात आली असती तर याची किंमत जवळपास २०० कोटी रुपये झाली असती. मेक इन इंडियाला चालना म्हणून रेल्वेसाठी वापरण्यात येणार ८० टक्के सामान देशातच बनवण्यात आलं आहे.
चारही बाजूंनी फिरणार सीट
या ट्रेनचे काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. ट्रेनच्या डब्यात असलेल्या सीट स्पेनवरून मागवण्यात आल्यात. या सीट ३६० डिग्रीमध्ये फिरवता येतात. या ट्रेनमधून प्रवास करण्याचा अनुभव एकदम वेगळा असेल.
या ट्रेनमध्ये दिव्यांगासाठी दोन विशेष बाथरूम आणि लहान बाळांसाठी विशेष जागा ठेवण्यात आली आहे.
डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा
या ट्रेनच्या प्रत्येक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलाय. या ट्रेनमध्ये टॉकबॅकची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे संकटसमयी तुम्ही ट्रेनच्या ड्रायव्हरसी बोलू शकता. अशाप्रकारची सुविधा मेट्रोमध्येही देण्यात येते.
साखळीऐवजी स्विच
या ट्रेनमध्ये गाडी थांबवण्यासाठी आधी वापरण्यात येणाऱ्या साखळीऐवजी स्विच बसवण्यात आलाय. संकटसमयी प्रवाशांना हा स्विच दाबावा लागणार आहे.
पुढे किंवा मागे कोणत्याही दिशेनं चालणार ट्रेन
या ट्रेनमध्ये एकुण १६ डबे आहेत. ही ट्रेन पुढे किंवा मागे अशा दोन्ही दिशांनी चालू शकते.
ट्रेनमध्ये ऑनबोर्ड इंफोटेनमेंट सुविधा
या ट्रेनमध्ये ऑनबोर्ड इंफोटेनमेंटची सुविधा देण्यात आली आहे. तसंच वायफाय, वॅक्यूम टॉयलेटची सुविधा आहे. ट्रेनमध्ये १६ डबे आहेत. ट्रेनमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना ड्रायव्हरच्या केबिनमध्येही लक्ष देता येणार आहे.