बायकोचा खुन, देशातला पहिला क्राईम शो करणाऱ्याला जन्मठेप
दिल्लीमधल्या कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीमधल्या कोर्टानं जुना टीव्ही शो निर्माता सुहैब इलियासीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १७ वर्षांपूर्वी बायकोचा चाकू खूपसून खून केल्याप्रकरणी सुहैब दोषी आढळला होता.
११ जानेवारी २००० साली सुहैबची पत्नी अंजूच्या शरिरावर चाकूचे वार करण्यात आले होते. जखमी अवस्थेमध्येच अंजूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला.
इंडियाज मोस्ट वाँटेड हा देशातला पहिला क्राईम शो करणारे सुहैब इलियासी चर्चेत आले होते. पण पत्नीची हत्या केल्याच्या आरोपावरून सुहैबला २८ मार्च २००० साली अटक करण्यात आली होती. हुंड्यासाठी सुहैबनं अंजूवर अत्याचार केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला होता. यानंतर सुहैबवर खटला चालला होता.