नवी दिल्ली : कोरोना या जागतिक महामारीमुळे सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना संकटात बँकांच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. भारत जीडीपीबाबत अजूनही सकारात्मक आहे. जी-20 देशांमध्ये भारताची परिस्थिती चांगली आहे. संकटामुळे भारताची जीडीपी 1.9 राहिल. जगात अंदाजे 9 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्तीकांत दास म्हणाले- मी आमच्या १५० अधिकाऱ्यांच्या, आमच्या कर्मचार्‍यांच्या टीमचे कौतुक व आभार मानू इच्छितो, जे त्यांच्या कुटुंबियांपासून दूर आहेत आणि २४ तास कर्तव्यावर आहेत जेणेकरून आवश्यक सेवा चालूच राहतील. आम्ही प्रत्येक परिस्थितीशी सामना करण्यास तयार आहोत. शक्तीकांत दास म्हणाले की, आयएमएफने भविष्यवाणी केली आहे की जगात सर्वात मोठी मंदी येणार असून ही धोक्याची घंटा आहे. अनेक देशांत आयात व निर्यातीत मोठी घट झाली आहे. परंतु, या दरम्यान आपले कृषी क्षेत्र शाश्वत आहे, आमच्याकडे बफर स्टॉक आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस चांगला होईल, अशी अपेक्षा आहे. फेब्रुवारीमध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत चांगली वाढ झाली.


आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, मार्च 2020 मध्ये निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून परकीय चलन साठा 476 अब्ज डॉलर्स असूनही 11 महिन्यांच्या आयातीसाठी ते पुरेसे आहे. जगात कच्च्या तेलाचे दर सतत कमी होत आहेत, ज्याचा फायदा होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व प्रकारच्या नोकर्‍या बंद आहेत. जगातील मध्यवर्ती बँका त्यांची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी सक्रिय आहेत आणि रिझर्व्ह बँकही याबाबतीत मागे नाही.


कोरोनाशी लढा देण्यासाठी काम करणाऱ्या सगळ्यांना आरबीआयचे गव्हर्नर यांनी सलाम केले. ते म्हणाले की, १९२९ नंतरची ही देशातील सर्वात मोठी आर्थिक घसरण आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ते म्हणाले की, आर्थिक परिस्थितीवर आमचं पूर्ण लक्ष आहे. या कठीण काळात प्रत्येकजण एकत्रित लढा देत आहोत.


रिव्हर्स रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी


रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केली आहे. बँकेने रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. यानंतर रिव्हर्स रेपो दर 4 टक्क्यांवरून घसरून 3.75 टक्क्यांवर आला. रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही.