नवी दिल्ली : देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे गुरूवारी निधन झाले. दिल्ली जवळील गुडगांव येथील एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळचे काश्मीरी असलेले फोतेदार १९५०च्या दरम्यान माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत दिल्लीला आले. हळूहळू त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच कॉंग्रेसमधले एक निष्ठावंत आणि जेष्ठ नेते म्हणून वरचे स्थानही मिळवले. १९८०च्या दशकात इंदिरा गांधी यांनी फोतेदार यांना आपले राजकीय सल्लागार बनवले. दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान राजीव गांधी यांनीही त्यांना आपले राजकीय सल्लागार म्हणून कायम ठेवले. राजीव गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून तीन वर्षे काम पाहिल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळात फोतेदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले.


कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोतेदार यांच्या निधनानंतर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. फोतेदार यांनी लोकांच्या हक्कांसाठी पाच दशकांहून अधिक काळ राजकीय जीवनात संघर्ष केला. अत्यंत गांभीर्याने जनतेची सेवा केली, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी फोतेदार यांच्याबद्धल भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, फोतेदार हे कॉंग्रेसचा मजबूत खांब होते. त्यांचे जाणे हे कॉंग्रेससाठी मोठे नुकसान असल्याची भावना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.