Republic Day : रक्त गोठवणाऱ्या वातावरणात `हिमवीरां`नी फडकवला तिरंगा
गुंजला `भारत माता की जय`चा घोष....
श्रीनगर : देशाच्या कानाकोपऱ्यात Republic Day प्रजासत्ताक दिनाला अतिशय उत्साहात सुरुवात झालेली आहे. यामध्ये प्रत्येकजण हिरीरिने सहभागी होत आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये देशाचं संरक्षण करणारे जवानही यात मागे नाहीत. याचीच प्रतिची प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली. लडाखमध्ये उणे २० अंश सेल्शिअस इतक्या तापमानात, रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवानांनी ध्वजारोहण केलं.
लडाखमध्ये १७००० फूट उंचीवर आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटन पोलीसांच्या तुकडीतील जवानांनी रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केलं. आयटीबीपीच्या जवानांनी बर्फाळ शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवला. हिमवीर म्हणून सैन्यदलात ओळखल्या जाणाऱ्या या तुकडीने 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'चा घोषही यावेळी केला.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने यावेळी या खास क्षणांची काही छायाचित्र पोस्ट केली. सोबतच एक व्हिडिओही पोस्ट केला. ज्यामध्ये या जवानांचा कधीही न मावळणारा उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्या आवाजात असणारा आत्मविश्वास जणू देशाच्या रक्षणकर्त्यांच्या भूमिकेची देशवासियांना हमीच देऊन गेला.
७१व्या प्रजासत्ताक दिनानानिमित्त विविध भागांमध्ये ध्वजारोहणासह इतरही काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई, दिल्ली अशा भागांमध्ये या दिवसाचं गांभीर्य पाहता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.