Indore Fire : आगीबाबत मोठा खुलासा, एकतर्फी प्रेमातून 7 जणांनी जीव गमावला
Indore Fire case: इंदौर येथील विजय नगर भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीत (Swarnbagh Colony) एका इमारतीला लागलेल्या आगीबाबत धक्कादायक आणि मोठी माहिती हाती आली आहे.
भोपाळ : Indore Fire case: इंदौर येथील विजय नगर भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीत (Swarnbagh Colony) एका इमारतीला लागलेल्या आगीबाबत धक्कादायक आणि मोठी माहिती हाती आली आहे. इमारत आगीत होरपळून सात जणांना मृत्यू झाला. आगीचे कारण आता पुढे आले आहे. कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे. काल सायंकाळी उशिरा पोलिसांनी या घटनेचा तपास करुन वास्तव उघड केले आहे. या प्रकरणातील आरोपी सहा महिन्यांपूर्वी याच इमारतीत भाड्याने राहत होता. एकतर्फी प्रेम आणि पैशाच्या वादातून त्याने आग लावल्याचे पुढे आले आहे. त्याच्या या कृत्यामुळे सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मूळचा झाशीचा रहिवासी असलेल्या संजय तथा शुभम दीक्षित याने ही भीषण आग लावल्याचे पुढे आले आहे. प्रेमात तो वेढा झाला होता. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे तो झाशीतून इंदौर येथे राहण्यास आला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त हरिनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पागल प्रियकर शुभम याने आधी एका तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला आणि मुलीने नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने ही भीषण आग लावली. अनाठायी प्रेमातून आरोपीने तरुणीची गाडी पेटवली आणि इमारतीला मोठी आग लागली. या घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर जळालेल्या 8 जणांवर उपचार सुरु आहेत.
महिलेची प्रकृती स्थिर
या आगीत बळी पडलेल्या महिलेची प्रकृती सामान्य आहे. पोलीस तिच्याशी बोलले आहेत. या प्रकरणाचा थरार खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, घटनेदरम्यान स्कूटीला आग लागली होती. आता फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे. हा गुन्हा करण्यासाठी काही ज्वलनशील साहित्याचा वापर करण्यात आला होता. आता आरोपींवर खुनासह इतर अनेक कलमांखाली कडक कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
तपास कसा पुढे गेला?
पोलीस आयुक्त हरिनारायण मिश्रा म्हणाले की, या आगीत पोलिसांनी परिसरात लावलेले 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तरुण घटनेच्या वेळी स्कूटीला आग लावताना दिसत आहे. तरुणांने सोबत ज्वलनशील साहित्य आणले होते, त्यातूनच ही जाळपोळ करण्यात आली.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
शहरातील विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीला आग लागली. त्यामुळे उन्हाळ्यात शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आग इतकी भीषण होती की 7 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. या आगीत भाजलेल्या लोकांना माय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या आगीने काही मिनिटांतच भीषण रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने इमारतीतील आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.