Anand Mahnidra on Odisha Train Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे दुर्घटना झाली असून, संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 288 प्रवासी ठार झाले आहेत. अपघातात तब्बल 900 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. या अपघातानंतर रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. 


आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भविष्यात पुन्हा असे अपघात होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. तसंच या दुर्घटनेसाठी कारणीभूत कारणांच्या मुळाशी गेलं पाहिजे असंही सांगितलं आहे. मानवी चूक असो किंवा तांत्रिक कारण, कोणत्याही परिस्थितीत अशी दुर्घटना व्हायला नको होती असं मत आनंद महिंद्रा यांनी मांडलं आहे. 


"ही दुर्घटना इतकी भीषण आहे की, संपूर्ण देशाने जीव गमावलेल्या स्मरणार्थ मूक चिंतन केलं पाहिजे. ओम शांती. आपण असे अपघात पुन्हा होऊ देऊ शकत नाही. या दुर्घटनेच्या मुळापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. मानवी किंवा तांत्रिक चुका असोत, दोन्हीपैकी कोणतीही चूक अशी विध्वंस घडवणारी नसावी. रेल्वेच्या कामकाजातील अयशस्वी-सुरक्षित यंत्रणा पुन्हा एकदा पडताळण्याची गरज आहे," असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. 



मोदींची घटनास्थळाला भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुर्घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली. नरेंद्र मोदी यांनी यावेळी या दुर्घटनेत दोषी आढळल्यांची गय केली जाणार नाही, त्यांना कडक शिक्षा होईल असा इशारा दिला आहे. 


"ही दुर्घटना दुर्दैवी आणि विचलित करणारी आहे. माझ्याकडे वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. या संकटाच्या काळात देव सर्वांना बाहेर पडण्यासाठी ताकद देवो," असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. पुढे ते म्हणाले की "या दु:खाच्या वेळी आम्ही मृतांच्या कुटुंबीयासोबत आहोत. रेल्वेनी आपली पूर्ण ताकद बचावकार्य आणि रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत करण्यावर लावली आहे. आम्ही आपल्या व्यवस्थेला अधिक प्राधान्य देत पुढील वाटचाल करत आहोत".


दरम्यान नरेंद्र मोदी यांनी थेट घटनास्थळावरुन कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. जखमींना योग्य आणि चांगले उपचार देण्याचे निर्देश यांनी दिले. दरम्यान, प्राथमिक तपासात सिग्नल यंत्रणेशी संबंधित चुकीमुळे दुर्घटना झाल्याचं कळत आहे.