इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. विश्वासू सेवक विनायक आणि एका तरुणी भोवती पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांची गेल्या चार दिवसांपासून चौकशी सुरु आहे. सबंधीत तरुणी भय्यू महाराज यांची कन्या कुहू हीची केअर टेकर असल्याची माहिती विनायकनं पोलिसांना दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुहूची सुमारे पाच तास चौकशी केली. मात्र कुहूने संबंधीत तरुणी आपली केअर टेकर नसल्याचं सागितलं आहे. घरातील कामं ती करायची आणि जास्तीत जास्त वेळ ती घरात असायची अशी माहिती कुहूने पोलिसांना दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ जूनला स्वत:ला गोळी मारुन त्यांनी आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाचा लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे. कुहूची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हाती आणखी काही माहिती लागली आहे. तरुणीने सांगितलं की, कुहूची केअर टेकर म्हणून ती भय्यू महाराजांच्या घरी राहत होती. पण कुहूने म्हटलं की, आईच्या मृत्यूनंतर ती पुण्याला राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर तरुणी घरकाम करत होती. पण डॉ. आयुषीसोबत भय्यू महाराजांनी विवाह केल्यानंतर ती तेथून निघून गेली होती.


कुहूने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी पुन्हा तरुणीला चौकशीसाठी बोलवलं. तरुणी आणि सेवकांची पुन्हा चौकशी झाली. पुन्हा सगळ्यांचं क्रॉस जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर पोलिसांना देखील असा संशय आहे तरुणी आणि सेवक भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत होते. लवकरच याबाबत ठोस माहिती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. याआधी घरगुती वादामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं पण ड्रायव्हर कैलाश पाटीलच्या खुलाशानंतर अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.