मुंबई : भारतीय नौदलाची निवृत्त विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आज लिलावात काढली जाणार आहे. मेटल स्क्रॅब ट्रेड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दुपारी १२ ते ४ दरम्यान हा लिलाव होणार आहे.भारतीय नौदलातील 21 वर्षांच्या सेवेनंतर विराट 6 मार्च 2017 ला सन्मानाने निवृत्त झाली होती. तेव्हापासून विमानवाहू युद्धनौका विराट ही मुंबईच्या नौदल तळावर उभी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या युद्धनौकेचे युद्ध संग्रहालयात रूपांतर करण्याबाबत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र सरकारने उत्सुकता दाखवली होती. मात्र यासाठी कोणीही ठोस पुढाकार घेतला नाही. तसंच केंद्र सरकार असो, नौदल... विराटचे युद्धसंग्रहालयात रूपांतर करण्याबाबत फारसे उत्सुक नव्हते. त्यातच नौदलाच्या तळावर जागा मर्यादित असतांना विराटमुळे भलीमोठी जागा नाहक अडवली जात होती. या सर्व कारणामुळेच अखेर विराट भंगारात काढण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला. 


विराट नौकेच्या आजच्या लिलावानंतर नौका प्रत्यक्षात तोडताना त्यातील किमान दहा टक्के लोखंडाचा वापर व्यावसायिक वापरासाठी केला जाणार असून हे लोखंड भारतीय कंपन्यांना पुरवले जाणार आहे. या संदर्भातील अट ठेवण्यात आली होती.



मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन या राज्य सरकारच्या मालकीच्या कंपनीमार्फत लवकर विराट भंगारात काढण्याबाबत ई लिलाव हा 17 डिसेंबरला केला जाणार आहे. नियमात बसणाऱ्या टेंडरद्वारे विराट भंगारात काढली जाणार आहे.


याआधी नौदलाची आयएनएस विक्रांत ही पहिली विमानवाहू युद्धनौका 1997 ला निवृत्त झाली होती. अखेर संग्रहालयमध्ये रूपांतर करण्यात अपयश आल्याने ऑगस्ट 2014 मध्ये विक्रांत भंगारात काढण्यात आली होती. आता विराटही त्याच मार्गाने जाणार आहे.