खराब कामगिरी केल्यास एकमेकांच्या कानाखाली मारा, कंपनीचा कर्मचाऱ्यांना अजब आदेश! जगभरातून निषेध
Viral News: कंपनीने खराब कामगिरी केल्यास त्यांना मेमो दिल्याचं किंवा त्यांच्यावर कारवाई केल्याचं तुम्ही ऐकलं किंवा अनुभवलं असेल. पण एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मंचावर येत एकमेकांना कानाखाली मारा असा अजब आदेश दिला आहे. यानंतर कंपनीला टीकेचा सामना करावा लागत आहे.
Viral News: एखादी कंपनी आपली कामगिरी खराब झाली असेल तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असते. अनेकदा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांच्या पगारात कपात किंवा मेमो दिला जातो. काही दिवसांपूर्वी एका कंपनीने कर्मचाऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी चिअर लीडर्स ठेवल्यां समोर आलं होतं. तर एका कंपनीने लीप डेला सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती, जेणेकरुन त्यांची झोप पूर्ण व्हावी. पण हाँगकाँगमधील एका कंपनीने अजब आदेश दिला आहे. कंपनीने खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कानाखाली मारण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे सर्वांसमोर कानाखाली मारा असं कंपनीने सांगितलं आहे. यानंतर संपूर्ण जगभरातून या कंपनीवर टीका होत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही एक इन्शुरन्स कंपनी आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत एक वार्षिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी सर्वजण डिनर करत होते. त्याचवेळी कंपनीचे बॉस मंचावर आले आणि खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंचावर बोलावलं. यावेळी त्यांनी एकमेकांना कानाखाली मारण्यास सांगितलं.
कर्मचाऱ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी ही अत्यंत अपमानास्पद वागणूक असल्याची भावना असल्याचं सांगत फेसबुकला पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे हे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आण चर्चेत आलं. जगभरातून कंपनीचा निषेध केला जात आहे. लोकांना हा हिंसेचा भाग असल्याचं सांगत कंपनीला टाळं ठोकलं पाहिजे असं म्हटलं आहे. तर काहींनी या विमा कंपनीचं नाव जाहीर करा अशी मागणी केली आहे. जर माझ्याकडे या कंपनीची विमा पॉलिसी असेल तर तात्काळ रद्द करु असं त्यांचं म्हणणं आहे. जी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना सन्माजनक वागणूक देऊ शकत नाही, ती इतरांना काय देणार असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
या घटनेनंतर काही कर्मचाऱ्यांनी आपला राजीनामा सोपवला असल्याची माहिती आहे. दरम्यान काही नेटकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्याआधी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे याबद्दल तक्रार करा असा सल्ला दिला आहे. दरम्यान काहींना मात्र या वृत्ताच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या घटनेचा कोणताही व्हिडीओ नसताना यावर विश्वास कसा ठेवायचा अशी विचारणा काहींना केली आहे.