Fight Over Biryani: भारतीय लोकांना बिर्याणी किती आवडते यासंदर्भात सांगताना, 'बिर्याणीच्या मुद्द्यावरुन भारतीयांमध्ये वाद होऊ शकतात' असं मस्करीमध्ये म्हटलं जातं. त्यातही हैदराबादी बिर्याणी ही देशात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या बिर्याणीमध्ये सर्वोत्तम असते असं खवय्ये सांगतात. याच हैदराबाजी बिर्याणीवरुन एका कुटुंबाने हॉटेलमध्ये असा राडा घातला की हॉटेलची अवस्था काही मिनीटांमध्ये 'होत्याचं नव्हतं झालं' अशी झाली.


न शिजलेल्या भातावरुन विचारलेला जाब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 च्या शेवटच्या दिवशी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबाबरोबर हैदराबादमधील मंगलहाट कुटुंबीय बिर्याणी खाण्यासाठी अबदीज रेस्तरॉमध्ये गेले होते. मात्र इथे त्यांना देण्यात आलेली बिर्याणी अर्धवट शिजलेली होती. यासंदर्भात कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी बाचाबाची सुरु केली. हे प्रकरण एवढं वाढलं की या हॉटेलमधील 10 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


मिळेल त्या गोष्टीने मारहाण


ग्राहकांनी अर्धवट शिजलेल्या बिर्याणीची तक्रार करताच हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरेरावीची आणि उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर कर्मचारी अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी या कुटुंबियावर खुर्च्या आणि बाथरुममधील साफसफाई करणाऱ्या वायपर्सबरोबरच अगदी पळी आणि मिळेल त्या गोष्टींचा वापर करुन हल्ला केला. कुटुंबियांनी मारहाण करु नये अशी विनंती कर्मचाऱ्यांना केली असता त्यांनी ग्राहकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून लोकांनी चिंता व्यक्त करतानाच रेस्तरॉ व्यवस्थापनावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.


बिल पाहिल्यानंतर राडा


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. पोलिसांनी 10 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन 31 डिसेंबरच्या सायंकाळी हे रेस्तरॉ बंद केलं. ज्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला त्या कुटुंबातील 6 जण या ठिकाणी उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. या कुटुंबाने आधी भाजी आणि रोटी मागवली. त्यानंतर त्यांनी बिर्याणी मागवली. मात्र बिर्याणीमधील तांदूळ अर्धवट शिजलेला असल्याची तक्रार ग्राहकांनी केली. त्यानंतर वेटरने बिर्याणीची दुसरी प्लेट आणली. मात्र बिल पाहिल्यानंतर त्यामध्ये 2 बिर्याणींचे पैसे मोजले होते. यावर कुटुंबियांनी आक्षेप नोंदवला. पहिली बिर्याणी शिजलेली नव्हती म्हणून ती खाल्लीच नव्हती असं असतानाही आणि हॉटेलची चूक असतानाही 2 बिर्याणींचे पैसे जोडण्यात आल्यावर आक्षेप घेतल्यावर रेस्तरॉ कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



पोलिसांनी काय माहिती दिली?


सहाय्यक पोलीस अधिक्षक ए. चंद्रशेखर यांनी, ग्राहकांनी बिलासंदर्भात विचारणा केली असता वाद झाल्याचं सांगितलं. मंगलहाट कुटुंबातील एका सदस्याने रागाच्याभरात रेस्तराँ कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण सुरु केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याविरोधात कलम 324, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नंतर त्यांना जातमुचलक्यावर मुक्त करण्यात आलं आहे.