ताजमहालपेक्षा प्रेमाचं प्रतिक महाराष्ट्रात, टाटा मेमोरियल सेंटरच्या निर्मितीची रंजक कहाणी!
आपण ताजमहालाल प्रेमाचं प्रतिक म्हणून पाहतो. पण त्या पेक्षा सुंदर प्रेामाचं प्रतिक आपल्या महाराष्ट्रात आहे. जमशेदची टाटाची मोठी सून मोहरबाई टाटाकडे जुबली डायमंड होता.
यशवंत साळवे, झी मीडिया, मुंबई : आपण ताजमहालाल प्रेमाचं प्रतिक म्हणून पाहतो. पण त्या पेक्षा सुंदर प्रेामाचं प्रतिक आपल्या महाराष्ट्रात आहे. जमशेदची टाटाची मोठी सून मोहरबाई टाटाकडे जुबली डायमंड होता. ज्याची किंमत कोहिनुर हिऱ्यापेक्षा दुप्पट होती. इ.स. 1924 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा मंदी आली, तेव्हा तेव्हा मोहराबाईंनी हा हिरा गहाण ठेऊन कर्मचा-यांचं वेतन सुरु ठेवलं. मोहराबाईंचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्यावर त्यांच्या पतीने, म्हणजे दोराबजी टाटा यांनी तो हिरा विकून त्या पैशाने रुग्णांसाठी टाटा मेमोरीयल हॉस्पिटल बांधलं. सहचारिणीच्या आठवणीत बांधलेलं हे स्मारक निस्सीम प्रेमासोबत मानवतेचा संदेश देखील देतं. आज लाखो रुग्ण तिथे कॅन्सरसह इतरही विविध आजारांवर उपचार घेत आहे.
टाटा मेमोरियल सेंटरच्या निर्मितीची पाया इथून रचला
लेडी मेहेरबाई टाटा यांचे 1932 मध्ये रक्ताच्या कर्करोगाने (CANCER) निधन झाले. त्यांनी दीर्घकाळ परदेशात उपचार घेतले. यानंतर सर दोराबजी टाटांनी कॅन्सर हॉस्पिटल बांधन्याचा चंग बांधला. भारतात कॅन्सर उपचारासाठी परदेशाप्रमाणे सुविधा निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी केला. सुरुवातीला मुंबईतील रेडियम इन्स्टिट्यूटपासून सुरू करण्याची योजना होती. पण, सर दोराबजी यांचे दुर्दैवाने 1933 मध्ये निधन झाले. त्यांची बांधीलकी इतकी होती की नंतर सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. टाटा हॉस्पिटलची सुरुवात 80 बेडपासून झाली. आज हे हॉस्पिटल कॅन्सर उपचारासाठी जगभरात ओळखले जाते.
सर दोराबजींचं स्वप्न पुर्ण झालं
जेआरडी टाटांच्या पाठिंब्यामुळे, मुंबईतील कामगार क्षेत्र असलेल्या परळच्या मध्यभागी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, सात मजली इमारतीचं स्वप्न 28 फेब्रुवारी 1941 रोजी साकार झाले.
1957 मध्ये, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने तात्पुरते टाटा मेमोरियल हॉस्पिटल ताब्यात घेतले. पण जेआरडी टाटा आणि भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे प्रणेते - होमी जहांगीर भाभा - कॅन्सरच्या उपचार प्रक्रियेत, इमेजिंगपासून स्टेजिंग आणि प्रत्यक्ष उपचारापर्यंतच्या किरणोत्सर्गाच्या भूमिकेचा अंदाज लावू शकले. 1962 मध्ये रुग्णालयाचे प्रशासकीय नियंत्रण भारताच्या अणुऊर्जा विभागाकडे (DAE) हस्तांतरित करण्यात आले. चार वर्षांनंतर, 1952 मध्ये स्थापन झालेली कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि टीएमसी यांचे विलीनीकरण झाले.
टाटा हॉस्पिटलचा विस्तार
15,000 चौरस मीटर परिसरात पसरलेल्या 80 खाटांच्या रुग्णालयापासून सुरुवात करून, TMC आता सुमारे 70,000 चौरस मीटर क्षेत्रफळ 600 खाटांसह सुसज्ज आहे. 1941 मध्ये वार्षिक बजेट रु. 5 लाख, तो आता जवळपास 120 कोटींवर जाऊन पोहोचलं आहे.