चिदंबरम १०६ दिवसांनी तुरूंगातून बाहेर, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
माजी गृहमंत्री पी चिदंबरम १०६ दिवसांनी बुधवारी संध्याकाळी तुरूंगातून बाहेर आले.
नवी दिल्ली : माजी गृहमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) १०६ दिवसांनी बुधवारी संध्याकाळी तुरूंगातून बाहेर आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे भव्य स्वागत केले. मुलगा कार्ती चिदंबरम याने मीडिया कॅमेऱ्यांसमोर विजयी चिन्ह दाखवताना दिसला. दिल्लीतील तिहार कारागृहाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. चिदंबरम यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. चिदंबरमचा पासपोर्ट जप्त केला जाईल आणि परवानगीशिवाय त्यांना देश सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते माध्यमांना कोणतीही मुलाखत देणार नाही. तसेच, त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या खटल्याच्या सुनावणीच्या विशेष न्यायाधीशांच्या समाधानास अनुसरुन चिदंबरम यांनी दोन जामीनदारांसह दोन लाख रुपयांचे जामीनपत्र जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणातील अन्य आरोपींवरील कारवाईचा जामीन आदेशावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी (Money laundering) पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात जावे लागले. चिदंबरम हे आज अखेर १०६ दिवसानंतर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज रात्री ८ वाजून २० मिनिटांनी त्यांची सुटका करण्यात आली. तुरुंगाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कार्ती चिदंबरमही त्यांच्यासोबत होते. चिदंबरम कोर्टाच्या बाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत 'काँग्रेस जिंदाबाद', 'पी. चिदंबरम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' च्या घोषणा दिल्या. चिदंबरम यांचे हार घालून स्वागतही करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र माध्यमांना काहीही प्रतिक्रिया न देता चिदंबरम निघून गेले.