तिहारमध्ये चिदंबरम यांच्या चौकशीनंतर ईडीने घेतले ताब्यात
पी.चिदंबरम यांच्या चौकशीसाठी तिहार तुरुंगात गेलेल्या ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांच्या चौकशीसाठी तिहार तुरुंगात गेलेल्या ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याआधी ईडीने तुरुंगात त्यांच्याशी दोन तास चर्चा केली. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर त्यांना तुरुंगातून बाहेर काढले जाईल. आता त्यांना तिहार तुरुंगातून बाहेर नेण्याचे आदेश ईडीला मिळाले नाही आहेत. एका स्थानिक न्यायालयाने ईडीला याप्रकरणी काँग्रेस ज्येष्ठ नेते चिदंबरम यांच्याशी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
गरज वाटल्यास चिदंबरम यांना अटक करण्याची परवानगीही न्यायालयाने दिली होती. चिदंबरम यांची पत्नी नलीनी आणि मुलगा कार्ति हे देखील तुरुंगाच्या परिसरात दिसले. चिदंबरम यांनी साधारण ५५ दिवस सीबीआय आणि न्यायालयीन कोठडीत काढले आहेत.
२१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.