पी. चिदंबरम यांची आज कोर्टात हजेरी; सीबीआय १४ दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता
बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडींनंतर सीबीआयने पी. चिदंबरम यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.
नवी दिल्ली: माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. यानंतर आज सकाळी त्यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. यावेळी सीबीआयकडून चिदंबरम यांची १४ दिवसांची कोठडी मागितली जाऊ शकते. तसेच चिदंबरम यांच्याकडूनही जामिनासाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो.
तत्पूर्वी बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडींनंतर सीबीआयने पी. चिदंबरम यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. यानंतर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांना शोधण्यात तपासयंत्रणांना यश आले नाही. यानंतर बुधवारी रात्री ते अचानकपणे काँग्रेसच्या मुख्यालयात अवतरले.
याठिकाणी त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
एकूणच पी. चिदंबरम यांच्या अटकेच्यानिमित्ताने बुधवारी दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.