IPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावना
`कोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे!`, असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी आहे. देशात दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेला बसतात. देशातील सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी धोरणात्मक नियोजन, समर्पण आणि शिस्तबद्धता आवश्यक असते. देशातील अनेक तरुण दिवस-रात्र या नागरी सेवा परीक्षेसाठी तयारी करत असतात. त्यांच्या आयुष्यात ही परीक्षा उत्तीर्ण करणं हे एकमेव ध्येय असतं. पण काहींना मात्र कितीही प्रयत्न केले तरी यशाची चव चाखता येत नाही. अशामध्ये काहीजण खच्ची होतात तर काहीजण पुढील मार्ग निवडतात.
नुकतंच एका आयपीएस अधिकाऱ्याची (IPS Officer) आपला रुममेट आणि खास मित्राशी भेट झाली. हा मित्र युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरला होता. या भेटीनंतर आयपीएस अधिकाऱ्याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
आयपीएस अधिकारी अर्चित चंदक यांनी आम्ही एकत्र राहून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत होतो असं सांगितलं आहे. "काल हर्षला भेटलो. माझा युपीएससीची तयारी करतानाचा फ्लॅटमेट आणि जवळचा मित्र. प्रचंड मेहनती आणि समर्पित. नोकरी सोडून 4 वेळा परीक्षा आणि 3 मुलाखती दिल्या. पण दुर्दैवाने परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही," असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
दरम्यान या पोस्टमध्ये त्यांनी आपला मित्र हर्ष सध्या ट्रायडंट हॉटेलमध्ये काम करत असल्याचीही माहिती दिली आहे. "सध्या एका चांगल्या पॅकेजसह ट्रायडंट हॉटेलमध्ये मोठ्या पदावर काम करत आहे. कोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अर्चित चंदक यांनी या पोस्टमध्ये मित्रासोबतचा फोटोही शेअर केला आहे. फोटोत दोघांनी ब्लेझर घातला असून, हसताना दिसत आहेत.
आयपीएस अधिकारी अर्चित चंदक यांची ही पोस्ट शेअर केल्यानंतर चांगलीच व्हायरल झाली आहे. तसंच यावर अनेकांनी कमेंट केल्या असून, युपीएससी म्हणजे जगाचा शेवट नाही. त्याच्याही पुढे चांगलं आयुष्य आहे असं एका युजरने म्हटलं आहे. तर एकाने लिहिलं आहे की, "सर्वात महत्त्वाचं म्हणजे कठोर परिश्रम करणं. जेणेकरून मी प्रयत्न केला नाही याची तुम्हाला खंत वाटू नये. किमान प्रयत्न करण्यासाठी उत्तम प्रेरणा". दरम्यान, युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल 16 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला आहे.