अश्लील जाहिरातींविषयी तक्रार करणाऱ्याची भारतीय रेल्वेकडून कानउघडणी....
तुमच्या अशा जाहिराती टाळण्यासाठी....
मुंबई : सोशल मीडियाचा वापर आणि बहुतांश ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता लक्षात घेत अनेक सरकारी कामांमध्येही या माध्यमांचा वापर केला जात आहे. याचं सुरेख उदाहरण म्हणजे रेल्वे मंत्रालय. रेल्वे मंत्रालयाच्या विविध विभागांचे सोशल मीडिया अकाऊंट आणि त्यावर येणाऱ्या अपडेट्स पाहता खऱ्या अर्थाने रेल्वे मंत्रालय सोशल मीडियावर सक्रिय आहे, असंच म्हणावं लागेल. नुकतच एका युजरला उत्तर देत हे पुन्हा एकदा सिद्धही झालं आहे.
अश्लील जाहिरातींविषयीची तक्रार करत एका सोशल मीडिया युजरने ट्विट केलं. ज्यामध्ये त्याने आयआरसीटीसी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाच्या अकाऊंटचा उल्लेख केला होता. 'अश्लील जाहिराती वारंवार आयआरसीटीसीच्या तिकीट आरक्षणाच्या अॅपवर येत आहेत. हे अतिशय लाजिरवाणं आणि त्रासदायक आहे', असं तक्रार करणाऱ्या त्या व्यक्तीने ट्विटमध्ये लिहिलं.
तक्रार स्वरुपात करण्यात आलेल्या या ट्विटला उत्तर देत @RailwaySeva या ट्विटर अकाऊंटवरुन त्या युजरला उत्तर देण्यात आलं.
'आयआरसीटीची गुगलच्या अॅड सर्व्हिंग टूलच्या सहाय्याने गुगल जाहिरातींचा वापर करते. ज्यामध्ये युजरचं लक्ष वेधलं जातं. या जाहिराती युजरच्या मोबाईलची हिस्ट्री आणि ब्राऊझिंग डेटा वापरुन दाखवण्यात येतात. त्यामुळे तुमच्या अशा जाहिराती टाळण्यासाठी तुमच्या मोबाईलची हिस्ट्री आणि ब्राऊझिंग डेटा क्लिअर करा', अशी थेट शब्दांतील कानउघडणी करण्यात आली.
रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या या ट्विटची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. अनेकांनीच हे ट्विट शेअर करत खऱ्या अर्थाने हे प्रकरण व्हायरल केलं आहे.