किंगफिशरनंतर आणखी एक एअरलाईन बंद होणार?
किंगफिशरनंतर आता आणखी एका विमानसेवा कंपनीवर बंद होण्याचं संकट आलं आहे.
मुंबई : किंगफिशरनंतर आता आणखी एका विमानसेवा कंपनीवर बंद होण्याचं संकट आलं आहे. जेट एअरवेजकडे बँकांचं कर्ज फेडण्याचेही पैसे नसल्याची माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर कर्ज एवढं वाढलंय की आता बँका कर्ज द्यायलाही तयार नाहीयेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्रालयानं सगळ्या संबंधित बँकांकडून याबद्दलची माहिती मागवली आहे. बँकांना जेट एअरवेजचं कर्ज एनपीएमध्ये जाण्याची भिती आहे.
किंगफिशरपेक्षाही जास्त कर्ज
कर्जामध्ये डुबलेल्या जेट एअरवेजची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही. कंपनीकडे त्यांचे कर्मचारी आणि पायलटना देण्यासाठीही पैसे नाहीत. कंपनीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारामध्येही कपात केली आहे. जेट एअरवेजवर किंगफिशरपेक्षाही जास्त कर्ज आहे. जेट एअरवेजवर ८,१५० कोटी रुपयांचं कर्ज आहे.
हवाई इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि इंडिगोचा मार्केट शेअर वाढल्यामुळे जेट एअरवेजची अवस्था खराब झाली आहे. २०१६ आणि २०१७ साली कंपनीचा नफा झाला पण २०१८ साली जेट एअरवेजला ७६७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नुकसान एक हजार कोटींच्यावर गेलं आहे.
जेट एअरवेजकडे फक्त दोन महिने पुरेल एवढाच पैसा शिल्लक आहे. पगारामध्ये कपात केल्यामुळे कंपनीला ५०० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. पण कंपनीला कर्ज आणि विमानसेवा सुरु ठेवण्याच्या खर्चासाठी १५०० कोटी रुपयांची गरज आहे. कंपनीनं मात्र या सगळ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.