`कलामसॅट`च्या माध्यमातून `मिसाईल मॅन`ला आदरांजली
इस्त्रोच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या `कलामसॅट`चे श्रीहरीकोटामधून यशस्वी उड्डाण
श्रीहरीकोटा : जगातील सर्वात लहान सॅटेलाईट 'कलामसॅट'ने गुरूवारी रात्री अवकाशात यशस्वी झेप घेतली. इस्त्रोने ही कामगिरी केली आहे. पोलर सॅटेलाईट लॉंच व्हीकल (PSLV) C-44 नुसार कलामसॅट आणि मायक्रोसॅटने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात झेप घेतली. भारतीय विद्यार्थ्यांच्या समुहाने 'कलामसॅट' तयार केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असलेले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव या सॅटेलाईटला देण्यात आले आहे. 'पीएसएलवी सी४४'ने 'मायक्रोसॅट-आर'ला यशस्वीरित्या त्याच्या कक्षेत स्थापित केले आहे. इस्त्रोच्या या यशस्वी मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांसोबतच मोदींनी पीएसएलवीच्या यशस्वी उड्डाणासाठी इस्त्रोचे, सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. इस्त्रोची प्रशंसा करत त्यांनी भारतीय अंतराळात केलेल्या नव्या विक्रमाची नोंद ट्विटमधून केली.
२०१९च्या इस्त्रोच्या पहिल्या मोहिमेमध्ये २८ तासांच्या उलट मोजणीनंतर रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी 'पीएसएलवी सी-४४' ने उड्डाण केले. हे पीएसएलवीचे ४६ वे उड्डाण आहे. 'पीएसएलवी सी-४४' हे ७४० किलोग्रॅम वजनाच्या 'मायक्रोसॅट-आर' उड्डाणाच्या जवळपास १४ मिनिटांनंतर २७४ किलोमीटर ध्रुवीय सूर्य तुल्यकालिक कक्षेत स्थापन करण्यात आले. त्यानंतर १० सेमी आकार आणि १.२ किलोग्रॅम वजनाच्या कलामसॅटला 'मायक्रोसॅट-आर'च्या आणखी वर स्थापित केले गेले.