मुंबई : 'चांद्रयान २' मोहिमेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. माध्यमांशी संपर्क साधताना त्यांनी ही माहिती दिली. सॉफ्ट लँडिंग करत असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. ज्यानंतर आता ऑर्बिटरला विक्रम लँडरचा शोध लागला आहे. इतकच नव्हे, तर ऑर्बिटरने लँडरचं थर्मल छायाचित्रही काढलं आहे. जे काही वेळात सर्वांसमोर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्हाला चंद्राच्या पृष्टावर असणाऱ्या विक्रम लँडरविषयीची माहिती मिळाली आहे आणि ऑर्बिटरने त्याचं थर्मल छायाचित्रही काढलं आहे. पण, अद्यापही पुढील संपर्क झालेला नाही', असं सिवन म्हणाले. 


आपली टीम यावर लक्ष ठेवून आहे, शिवाय आपण लँडरशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे येत्या काळात लवकरच संपर्क होईल, असा विश्वासही त्यांनी दिला. सिवन यांनी दिलेल्या या माहितीमुळे अंतराळ विश्वात एक नवी उमेद पाहायला मिळत आहे. आता साऱ्या देशाचं आणि विश्वाचंही लक्ष इस्रोकडून येत्या काळात मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लागलं आहे. 



येत्या काळात १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्रोकडून सातत्याने करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला भारताची ही चांद्रयान २ मोहिम ९५ टक्क्यांपर्यंत यशस्वी झाली आहे. त्यातच आता लँडरशी संपर्क होत असण्याच्या प्रक्रियेत प्रगती पाहता ही मोहिम शंभर टक्के पूर्णत्वास नेण्यासाच इस्रोचा मानस आहे.