श्रीनगर:  पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालायकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता भविष्यात ज्यावेळी सुरक्षा दलांचा ताफा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल तेव्हा संबंधित परिसरातील नागरी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येईल. यामुळे नागरिकांची गैरसोय होईल. त्यासाठी आम्ही दिलगीर असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तसेच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे निर्देशही राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारांना दिले आहेत. या हल्ल्यामुळे आमचे मनोधैर्य बिलकूल खचलेले नाही. या सगळ्याकडे आम्ही दहशतवादाविरुद्धची लढाई म्हणून पाहत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी दुपारी बडगाममधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) मुख्यालयात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी जवानांचे मृतदेह असलेल्या शवपेटीला खांदा दिला. यावेळी जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, लष्कराच्या उत्तर मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह त्यांच्यासोबत उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी यावेळी काश्मीरमधील परिस्थितीचाही आढावा घेतला.




दरम्यान राजनाथ सिंह शनिवारी नवी दिल्लीला पोहोचल्यावर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत काश्मीरमधील सद्यःस्थिती आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय याबद्दल सर्व पक्षाच्या नेत्यांना माहिती देण्यात येईल.