नवी दिल्ली: येत्या काही दिवसांमध्ये देशभरात कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रादुर्भाव शिगेला (Peak Point) पोहोचेल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेकडून (ICMR) एक महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये देशात दररोज कोरोनाचे साधारण १५०० रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ३ मेपर्यंत देशात कोरोनाचा पीक पॉईंट येईल का, असा प्रश्न एका पत्रकाराकडून विचारण्यात आला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाला उत्तर देताना ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले की, ३ मेपर्यंत भारतात कोरोनाचा पीक पॉईंट येईल का, या प्रश्नाचे उत्तर देणे सध्याच्या घडीला अवघड आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव स्थिर आहे. तसेच पॉझिटिव्हीटी रेट ४.५ टक्के इतका आहे. त्यामुळे आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी केले, असेही म्हणता येईल. परंतु, तुर्तास भारतात कोरोनाचा पीक पॉईंट कधी येईल, याचा अंदाज बांधणे अवघड असल्याचे बलराम भार्गव यांनी सांगितले. 

भारतात गुरुवारी कोरोनाचे १४०९ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१,३९३ इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या प्रादुर्भावाचा एक आलेख (ग्राफ) सादर करण्यात आला. या ग्राफनुसार इंग्लंड, अमेरिका आणि इटली या देशांच्या तुलनेत भारताने परिस्थितीवर बरेच नियंत्रण मिळवल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनच्या ३० दिवसांमध्ये आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाला बऱ्यापैकी आळा घातला आहे. तसेच कोरोना टेस्टच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. पुढील परिस्थितीचा सामना करण्यासाठी  लॉकडाऊनच्या वेळेचा उपयोग केला जात असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे सचिव सी.के. मिश्रा यांनी दिली.