धार्मिक सलोखा जपण्यासाठी दरवेळी हिंदूंनीच दबून राहणे चुकीचे- गिरीराज सिंह
कोणत्याही मुदद्यावर आंदोलन करणे किंवा त्याला पाठिंबा देणे, हा लोकांचा घटनादत्त अधिकार आहे.
पाटणा: समाजातील धार्मिक सलोखा जपणे म्हणजे दरवेळी हिंदूंनीच दबून राहायचे, असा समज व्यवस्थेने करुन घेतल्याचे वक्तव्य भाजपा खासदार गिरीराज सिंह यांनी केले. २०१७ मध्ये रामनवमीच्यावेळी झालेल्या दंगलप्रकरणी अटक झालेला बजरंग दलाचा कार्यकर्ता जितेंद्र प्रताप याची गिरीराज सिंह यांनी आज तुरुंगात जाऊन भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, नितीश कुमार सरकार हिंदुंचा अपमान करत आहे. हिंदुंनी दबून राहिले तरच समाजात धार्मिक सलोखा जपला जातो, असा समज बहुधा येथील व्यवस्थेने करुन घेतला आहे. ही गोष्ट अत्यंत दुर्देवी आहे. ही मनोवृत्ती सोडून द्या, हे मी त्यांना सांगितले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जाणुनबुजून अटक करून हिंदुंना डिवचले जात आहे. कोणत्याही मुदद्यावर आंदोलन करणे किंवा त्याला पाठिंबा देणे, हा लोकांचा घटनादत्त अधिकार आहे. सध्या बिहारमधील पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत. हिंदुंच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली करुन त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. ही गोष्टी चुकीची असल्याचेही गिरीराज सिंह यांनी सांगितले.