`माझ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू, मृतदेह घरातच पडलाय`
`आता मी काय करु?`...
नवी दिल्ली : चीनपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. इटलीमध्येही या व्हायरसने लोकांचं जगणं अतिशय कठीण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे २५० लोकांचा मृत्यू झाला आहे. या धोकादायक संसर्गामुळे संपूर्ण इटलीमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच आता कोरोना व्हायरसबद्दल सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याची चर्चा आहे. हा व्हिडिओ कोरोना संसर्गाबाबत असल्याचं म्हटलं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, लूका फ्रेंजी (Luca Framzese) नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हडिओमध्ये त्याने कोरोना व्हायरसमुळे त्याच्या बहिणीचा मृत्यू झाल्याचं सांगितल्याचं बोललं जातंय. आतापर्यंत तो बहिणीचे अंतिम संस्कार करु शकला नाही. लूका फ्रेंजी दोन दिवसांपासून आपल्या बहिणीच्या मृतदेहासोबत घरात असून आता पुढे काय करावं हेच त्याला समजतं नाहीये.
व्हिडिओ शेअर करत लूकाने, कोरोना व्हायरसमुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे आणि आता काय करायचं हे मला समजत नाहीये. मला एकट्याला ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे मी तिचे अंतिम संस्कार करु शकत नसल्याचं त्याने म्हटल्याचं बोललं जातंय. लूकाच्या या व्हिडिओमध्ये, मागे बेडवर त्याच्या बहिणीचं प्रेत दिसत असल्याचं म्हटलं जातंय.
मिळालेल्या माहितीनुसार, लूकाच्या बहिणीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनाही या आजाराची लागण होण्याची भीती असल्याने इटली सरकारने लूका आणि त्याच्या कुटुंबियांना आयसोलेशनवर ठेवलं असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे लूका आणि त्याचे कुटुंबिय बहिणीचे अंतिम संस्कारही करु शकले नसल्याचं म्हटलं जातंय.