आयटी रिटर्न भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, तारीख वाढविल्याची अफवा
इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर उद्या शेवटचा दिवस आहे.
मुंबई : तुम्ही आपला आयटी रिटर्न (इन्कम टॅक्स रिटर्न) भरला नसेल तर उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तात्काळ काम करुन घ्या, अन्यथा नंतर तुम्हाला रिटर्न भरता येणार नाही. दरम्यान, रिटर्न भरण्याची तारीख वाढविण्यात आली असून ती ३० सप्टेंबरपर्यंत आहे, असा समाज माध्यमांत मेसेज फिरत होता. हा मेसेज अफवा आहे, असे केंद्रीय आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्ट २०१९ आहे.
२०१८-१९ या आर्थिक वर्षातील आयकर परतावा उद्या भरण्याचा अंतिम दिवस आहे. आयकर भरण्यासाठी (Income Tax Return) सर्वांचीच तारांबळ उडत असते. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवला असेल तर तो खोटा आहे. हा मेसेज खरा वाटावा यासाठी केंद्रीय थेट कर मंडळाचे (CBDT) एक कथित पत्र सुद्धा सोबत जोडले आहे. आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांची दिशाभूल होऊ नये यासाठी सीबीडीटीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सीबीडीटीने एक ट्विट करून यासंबंधी माहिती दिली आहे.
आयटी रिटर्न फायलिंगची कोणतीही तारीख वाढवण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा आहे, असे केंद्रीय थेट कर मंडळाने स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्ट २०१९ हीच अंतिम तारीख असून करदात्यांनी त्याआधी आयटीआर फाईल दाखल करावी, असे आवाहन CBDT कडून करण्यात आले आहे.