मुंबई : 'फूड डिलिव्हरी' ऍप 'झोमॅटो' पुन्हा एकदा चर्चेत आहे. धर्माच्या नावावर भेदभाव करत ग्राहक म्हणून कंपनीवर दबाव टाकू पाहणाऱ्या एका सोशल मीडिया युझरला कंपनीकडून चांगलंच प्रत्यूत्तर देण्यात आलंय. याबद्दल सोशल मीडियावर 'झोमॅटो'च्या भूमिकेची वाहवा होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जबलपूरमध्ये पंडित अमित शुक्ल (@Namo_SARKAAR) या ट्विटर युझरनं 'झोमॅटो'वर मंगळवारी एक ऑर्डर दाखल केली होती. ऑर्डरची दखल घेत कंपनीकडून अन्न पोहचतं करण्यासाठी 'फय्याज' नावाच्या एका व्यक्तीवर हे काम सोपवण्यात आलं. यावर अमित यानं 'पवित्र श्रावण महिन्यात मुस्लीम व्यक्तीवर हे काम सोपवण्यावर आक्षेप' घेतला. 




हे लक्षात येताच अमित या ग्राहकानं आपली ऑर्डर रद्द केली. इतकंच नाही तर सोशल मीडियावर, 'मी झोमॅटोवरून नुकतीच माझी ऑर्डर रद्द केली कारण त्यांनी अन्न पोहचतं करण्यासाठी एका मुस्लीम व्यक्तीकडे हे काम सोपवलं. रायडर व्यक्ती बदलण्यास त्यांनी नकार दिला आणि पैसेही परत करण्यात नकार दिला. मला रिफन्ड नकोय. ऑडर रद्द केली' असं ट्विट शुक्ला यानं केलं. 



यावर 'झोमॅटो'नं ग्राहकाला प्रत्यूत्तर देत एक ट्विट केलं. 'अन्नाला कोणताही धर्म नसतो. अन्न हाच एक धर्म आहे' असं झणझणीत प्रत्यूत्तर कंपनीकडून देण्यात आलं. 



अन्न पोहचतं करण्यासाठी तयार असताना रद्द केलं म्हणून 'झोमॅटो'नं २३७ रुपये अमित या ग्राहकाकडून वसूल केले. यावर चिडून अमितनं 'हे ऍप डिलीट करत असून आपल्या वकिलांशी याबद्दल सल्लामसलत करणार असल्याचं' ट्विट केलं. 



या अनुभवाबद्दल 'झोमॅटो'चे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी कंपनीसाठी 'मूल्य' महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. 'भारताच्या संकल्पनेवर, आमच्या ग्राहकांच्या आणि भागीदारांच्या विविधतेवर आम्हाला अभिमान आहे. आमच्या मूल्यांच्या आड येणाऱ्या ग्राहकाला गमावण्यासाठी आम्हाला वाईट वाटणार नाही' असं ट्विट त्यांनी केलंय. 



'झोमॅटो'नं घेतलेल्या भूमिकेचं सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसतंय. तर काहींनी 'धार्मिक भेदभाव' करणाऱ्या सोशल मीडिया युझरला धारेवर धरलंय. 'अन्न हिंदू व्यक्तीनेच शिजवलं, याची पडताळणी केलीस का?' अशीही विचारणा एका ट्विटर युझरनं पंडित अमित शुक्ल (@Namo_SARKAAR) याच्याकडे केलीय.